CoronaVirus News: लॉकडाऊन अपयशी, मोदींनी पुढील रणनीती स्पष्ट करावी- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 11:43 PM2020-05-26T23:43:32+5:302020-05-26T23:44:32+5:30

कोरोनाची लढाई संपलेली नाही. खरी लढाई तर आता सुरू झाली आहे.

 Lockdown failed, Modi should explain next strategy- Rahul Gandhi | CoronaVirus News: लॉकडाऊन अपयशी, मोदींनी पुढील रणनीती स्पष्ट करावी- राहुल गांधी

CoronaVirus News: लॉकडाऊन अपयशी, मोदींनी पुढील रणनीती स्पष्ट करावी- राहुल गांधी

Next

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : देशात ६० दिवसांच्या लॉकडाऊन नंतरही कोरोनावर नियंत्रण मिळविता आलेले नाही. ही साथ वेगाने पसरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली रणनीती पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे. आता सरकारने स्पष्ट करावे की, त्यांच्याकडे काय धोरण आहे? जेणेकरून, हा आजार, देशाची अर्थव्यवस्था आणि गरिबांच्या समस्यांवर तोडगा निघू शकेल. पंतप्रधान मोदी बॅकफूटवर गेले आहेत. त्यांनी समोर येऊन सांगायला हवे की, काय करायला हवे, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सरकारला लक्ष्य केले.

मीडियाशी चर्चा करताना ते म्हणाले की, कोरोनाची लढाई संपलेली नाही. खरी लढाई तर आता सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊनसाठी २१ दिवस मागितले होते. आज ६० दिवस झाले आहेत. सरकारने स्पष्ट करावे की, लॉकडाऊनचे लक्ष्य साध्य झाले आहे काय? जाहीर आहे की, लॉकडाऊन अपयशी ठरले आहे. मात्र, आता सरकारची काय रणनीती आहे? देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकार काय करणार आहे? एमएसएमईची मदत कशी करणार? गरीब, वृद्ध आणि संसर्गाचा धोका असणाऱ्या दुसºया लोकांसाठी सरकार काय करणार आहे? याचा खुलासा करावा. एकीकडे कोरोनाची साथ वाढत आहे आणि आम्ही लॉकडाऊन हटवीत आहोत? हा काय प्रकार आहे, असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकारांशी अगोदर विचारविमर्श करायला हवा होता. मला असे वाटते की, जोपर्यंत लोकांना रोख रक्कम दिली जात नाही तोपर्यंत काहीही होणार नाही.

चीनच्या मुद्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सरकारने पारदर्शकता ठेवावी. जोपर्यंत वस्तुस्थिती समोर येत नाही तोपर्यंत टिप्पणी करणे योग्य नाही. उत्तर प्रदेश सरकारकडून श्रमिक आयोग बनवून लावण्यात आलेल्या अटींवर टीका करताना ते म्हणाले की, प्रत्येक नागरिक अगोदर भारतीय आहे आणि त्याला कोठेही काम करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याच्यावर अंकुश लावला जाऊ शकत नाही.

संकटकाळातही काँग्रेसचे राजकारण -जावडेकर

राहुल गांधी यांच्या आरोपाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खंडन केले व राहुल गांधींचे वक्तव्य म्हणजे संकटकाळातही राजकारण करण्याच्या काँग्रेसी कृतीचे उदाहरण आहे, असा प्रतिटोला लगावला. कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण आधीच्या तीन दिवसांवरून आता १३ दिवसांपर्यंत लांबले हे ‘लॉकडाऊन’चेच यश आहे, असे जावडेकर म्हणाले. ते म्हणाले की, आधी काँग्रेसने ‘लॉकडाऊन’ लागू करण्यास आक्षेप घेतला होता. आता ते उठविले जाण्यास त्यांचा आक्षेप आहे. यावरून त्यांचा गोंधळच व्यक्त होतो.

Web Title:  Lockdown failed, Modi should explain next strategy- Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.