कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या काळात सरकारकडून लोकांची काळजी घेतली जात असली तरी बऱ्याच जणांना त्रास सहन करावा लागला आहे. यात मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये मजुरांसाठी गाड्या, ट्रेन यांची व्यवस्था केल्यानंतरही अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.
लॉकडाऊन संपण्यासाठी आणखी तीन दिवस बाकी आहे. मात्र सरकार चौथ्या लॉकडाऊनच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे गोरगरिबांचे हाल सुरुच आहेत. अनेक मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी इतर राज्यात स्थलांतरित झाले होते. मात्र कोरोनामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी मजुरांनी शहर सोडत आपल्या गावी जाण्यासाठी वाट धरली. शेकडो मैलांची पायपीट करीत आपापल्या गावी निघाले आणि पोहोचले. मजुरांना कशाप्रकारे प्रवासादरम्यान संघर्ष करावा लागत आहे, याच्या बातम्या रोज आपल्या कानावर येतात. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
पैसे संपले आणि पोटासाठी अन्न जवळ नाही. अशात घरीही पोहचायचे आहे. त्यामुळे एका मेंढपाळाला एक बैल अर्ध्या किंमतीत विकावा लागला. या मेंढपाळाने बैल ५ हजारांत विकला. बैलाची किंमत १५ हजार होती. मात्र असहायतेचा फायदा घेत बैल विकत घेणाऱ्याने केवळ ५ हजार रुपये दिले. एक बैल विकल्याने दुसऱ्या बैलासोबत बैलगाडी ओढण्यासाठी मेंढपाळाने स्वतःच्याच १५ वर्षांच्या मुलाला बैलासारखे जुंपले. पोटात अन्न नाही, पायात नीट चप्पल नाही. रणरणत्या उन्हात हा लहानगा बैल गाडी ओढत होता. या कुटुंबाला गेले काही तास घरी परतण्यासाठी असा संघर्ष करावा लागत आहे.