बिलासपूर : काँग्रेसचे आमदार शैलेश पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कथितरित्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शैलश पांडे यांनी बिलासपूरमध्ये मोफत रेशन देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांच्या घरासमोर लोकांची गर्दी झाली होती.
जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आमदार शैलेश पांडे यांच्या घरासमोर लोक जमा झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. यावेळी जवळपास एक हजार लोक एकत्र आले होते. हे राज्य सरकारद्वारे लावण्यात आलेल्या कलम १४४ चे उल्लंघन आहे. त्यामुळे कलम १८८ आणि २७९ नुसार कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ओपी शर्मा यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात कलम १४४ लागू केले आहे. दरम्यान, याप्रकरणी शैलेश पांडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, "ज्यावेळी मी घरी पोहोचलो, त्यावेळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. याची माहिती मीच पोलीस अधीक्षक ओपी शर्मा यांना दिली."
शैलेश पांडे म्हणाले, "मी पोलिसांना फोन करून गर्दी कमी करण्यास सांगितले होते. तसेच, मी फक्त गरजूंना मदत करण्याची घोषणा केली होती. यामध्ये काहीच चुकीचे नाही आहे. मात्र, त्यावेळी पोलिसांनी गर्दी कमी का केली नाही? हा गुन्हा कसा होऊ शकेल? मी लोकांना येण्यास सांगितले नव्हते."याचबरोबर, याठिकाणी लोक जमा झाले, कारण संचारबंदी पूर्णपणे केली नव्हती. पोलिसांनी लोकांना रोखले पाहिजे होते, असे शैलेश पांडे यांनी सांगितले. तसेच, या घटनेमागे भाजपाचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला.