नवी दिल्ली - संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना जीवनावश्यक वस्तु मिळणेही दुरापास्त झाले आहे. अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या उत्तर कर्नाटकमधून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक युवक दूध विक्री न झाल्याने निराश झालेला दिसत आहे. या निराशेतून तो दूध केनॉलमध्ये सोडताना दिसत आहे.
सीएनबीसी-टीव्ही१८ संबंधीत युवकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये युवक केनॉलमध्ये दूध सोडत आहे. लॉकडाउनमुळे सध्या डेअरीमध्ये ३२ ऐवजी १५ रुपये लिटरने दुधाची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकमधील चिक्कोडी येथे १५०० लिटर दूध केनॉलमध्ये सोडून देण्यात आले. दूध केनॉलमध्ये सोडताना लोकांनी यावेळी ‘गो कोरोना गो’च्या घोषणा दिल्या. लॉकडाउनमुळे देशातील अनेक भागात दूध वाटप ठप्प झाले आहे.
राज्यातील दूध डेअरीने देखील दूध उत्पादकांकडून दूध खरेदी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांसमोर संकट उभे राहिले आहे. त्यातच हॉटेल बंद असल्यामुळे दूध पडून आहे. तर दुसऱ्या राज्यात पाठविण्यात येणारे अडीच लाख लिटर दुधही पडून आहे.