नवी दिल्ली : लॉकडाऊन संपल्यानंतर १७ मेपासून विमानसेवा पुन्हा सुरू करावी, यासाठी केंद्र सरकार विविध विमान कंपन्यांशी सध्या चर्चा करीत आहे. पहिल्या टप्प्यात देशांतर्गत विमानसेवा व त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.विमानामध्ये जोडून असलेल्या दोन आसनांपैकी एक आसन फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी रिकामे ठेवण्याच्या पर्यायही विचारात घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या तसेच विमान कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण न होता विमानसेवा पुन्हा कशी सुरू करता येईल, यावर केंद्र व विमान कंपन्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संमती घेतल्यानंतरच या अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल.
लॉकडाऊन संपल्यानंतर विमान वाहतूक पुन्हा सुरू झाल्यास दिल्ली विमानतळावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी सेल्फ चेक इन-मशिन, चेक-इन-बेज अशा सुविधा विमान कंपन्यांना पुरविण्यात येतील. विमानतळावरील खाद्यपदार्थांची व किरकोळ विक्रीची सर्व दुकाने उघडी ठेवली जातील. दिल्ली विमानतळाची देखभाल करणाºया जीएमआर ग्रुपच्या दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड या कंपनीने केंद्र सरकारला या संदर्भात कळविले आहे. दिल्ली विमानतळावर सामानाच्या निर्जंतुकीकरणासाठी अल्ट्रा व्हायोलेट डिसइन्फेक्शन टनेलचा वापर करण्यात येईल.