Lockdown News: देशभरात लागू केलेला लॉकडाऊन अजून किती काळ?; सोनिया गांधींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 06:52 AM2020-05-07T06:52:44+5:302020-05-07T06:53:04+5:30
सध्या देश आर्थिक संकटात असून, त्या स्थितीबाबत काँग्रेसच्या या बैठकीत सविस्तर चर्चा झाली
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : देशभरात कोणत्या निकषांवर लॉकडाऊन लागू केला व तो आणखी किती काळ कायम राहणार आहे, याची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जनतेला दिली पाहिजेत, अशी जोरदार मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे.
काँग्रेसशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, लॉकडाऊनला १७ मेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, त्यानंतर या देशात नेमकी स्थिती काय असेल, याचे उत्तर मोदी सरकारने दिले पाहिजे. लॉकडाऊन आणखी किती काळ चालणार आहे, याबद्दल मोदी सरकारने जनतेला माहिती दिली पाहिजे. या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले की, लॉकडाऊनचा आता तिसरा टप्पा सुरू आहे. त्यातही पुन्हा मुदतवाढ करून मोदी सरकार लॉकडाऊनचा चौथा आणि पाचवा टप्पाही गाठणार की काय? लॉकडाऊन लागू करण्यामागची सर्व कारणे जनतेला कळणे आवश्यक आहे.
सध्या देश आर्थिक संकटात असून, त्या स्थितीबाबत काँग्रेसच्या या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की, कोरोनाविरोधात राज्य सरकारे लढा देत आहेत आणि केंद्र सरकार स्वत:ची तिजोरी भरण्याच्या मागे लागले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले की, सध्याच्या संकटकाळात केंद्राने राज्यांना भरीव आर्थिक मदत केली पाहिजे. कोरोनामुळे राजस्थानचे १० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
करवाढीचा निषेध करा : पी. चिदम्बरम
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम म्हणाले की, राज्ये अडचणीत असूनही केंद्र सरकार त्यांना आर्थिक मदत देण्यास तयार नाही. पेट्रोल, डिझेलवरील करवाढीचा जनतेने विरोध केला पाहिजे. पेट्रोल, डिझेलवरील करात राज्य सरकारांनीही वाढ केली पाहिजे, असे मत काँग्रेसच्या काही मुख्यमंत्र्यांनी मांडले. पण या विचाराबाबत बैठकीत एकमत होऊ शकले नाही. उत्तर प्रदेश व दिल्ली येथील सरकारांनी पेट्रोल व डिझेलवरील करात वाढ केली आहे, ही बाब इथे उल्लेखनीय ठरते.