बडवानी – कोरोनामुळे संपूर्ण देशभरात संकट असताना केंद्र सरकारकडून काही जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. या कालावधीत दारुची दुकाने सुरु करण्यासही परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या २ दिवसांपासून दारुच्या दुकानांसमोर तळीरामांच्या रांगा पाहायला मिळत आहे. सरकारला यातून मोठ्या प्रमाणात महसूलही मिळत आहे.
देशातील अनेक राज्यांनी दारुची दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊनमुळे ज्या मद्यप्रेमींना दारु घेता आली नाही. त्यांनी सरकारच्या या निर्णयानंतर दारुच्या दुकानाबाहेर रांगा लावायला सुरुवात केली. काही ठिकाणी अक्षरश: तळीरामांनी गर्दी केल्याने सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडालेला पाहिला मिळाला तर काही ठिकाणी पोलिसांनी तळीरामांना काठ्यांचा प्रसादही दिला.
मात्र मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात दारुचं दुकान उघडं असूनही एकही तळीराम याठिकाणी फिरकला नसल्याने मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या दारुच्या दुकानाबाहेर पोलिसांनी बंदोबस्तदेखील लावला होता. पण तळीरामांनी दारुच्या दुकानाकडे पाठ फिरवली.