नवी दिल्ली : ४० दिवसांच्या लॉकडाऊनमुळे रेल्वेच्या महसुलातील तूट ९० हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २४ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन सुरू झालेला तेव्हा, रेल्वेने जारी केलेल्या अंदाजात २०२०-२१ मध्ये एकूण महसूल घसरून १.४८ लाख कोटी रुपयांवर येईल, असे म्हटले होते. यात महसुलातील ६३ हजार कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली होती. वित्त वर्ष २०१९-२० मध्ये रेल्वेच्या महसुलात आधीच २८ हजार कोटींची तूट होती. अशा प्रकारे रेल्वेची एकूण महसुली तूट ९० हजार कोटी रुपयांवर जाणार आहे.
सूत्रांनी सांगितले की, ही आकडेवारी लॉकडाउन ३.० जाहीर होण्याच्या आधीची म्हणजेच ३ मेपर्यंतची आहे. त्यानंतर वाढविण्यात आलेल्या लॉकडाउनचा हिशेब यात नाही. तो हिशेब केल्यास महसुलातील तूट आणखी वाढणार आहे. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात २०२०-२१मध्ये रेल्वेचे एकूण उत्पन्न २.२५ लाख कोटी रुपये गृहीत धरण्यात आले होते. त्यावेळी महसुलातील तूट फक्त १०० कोटी रुपयांची होती. चालू वित्त वर्षात मिळणाऱ्या महसुलातून आपला खर्च भागविण्यास रेल्वे असमर्थ असल्याचे दिसून येत आहे, असे अहवालात म्हटले आहे.मालवाहतुकीचा महसूल घटणारअर्थसंकल्पात प्रवासी भाड्यापोटी रेल्वेला ६१ हजार कोटी रुपये मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तथापि, प्रत्यक्षातील उत्पन्न ३० हजार कोटींच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. महसुलातील तुटीमागील हे मुख्य कारण आहे. मालवाहतुकीपोटी मिळणारा महसूल अर्थसंकल्पात १,४७,००० कोटी रुपये गृहीत धरण्यात आला आहे. तथापि, त्यात सुमारे ३० टक्के घसरण होईल, असे दिसून येत आहे. यासंबंधीचा एक अहवाल वित्त आयोगास सादर करण्यात आला आहे.