उमेश जाधव
नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने तीन दिवसांपूर्वी दिल्ली सरकारला पत्र पाठवून विद्यार्थ्यांना परत पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले होते. मात्र, आॅनलाईन नोंदणीसाठी देण्यात आलेले संकेतस्थळ बंद असल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनीही प्रतीक्षा करण्यास सांगितल्याने परतीचा मार्ग खडतरच झाला आहे. या नोंदणीचा क्रमांक नोडल अधिकाऱ्यांकडे गेल्यावर दिल्ली सरकारचे आरोग्य पथक विद्यार्थ्यांची आरोग्य चाचणी करील. सध्या केवळ दिल्ली ते भुसावळ हाच मार्ग निश्चित करण्यात आल्याचे महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. मात्र, नागपूर, मुंबई, पुणे या मार्गांचाही विचार सुरू आहे. महाराष्ट्रातील आपत्कालीन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी निवासी आयुक्त समीर सहाय यांना पाठविलेल्या पत्रात दिल्ली-भुसावळ मार्ग निश्चित आहे. मात्र, रेल्वेकडून अंतिम परवानगीची प्रतीक्षा असल्याचे सांगितले.संकेतस्थळ बंद असल्याने विद्यार्थ्यांची नोंदणीच होत नाही. त्यामुळे नोंदणी होण्यासाठी मी दिल्ली सरकारच्या अधिकाºयांसोबत चर्चा करीत आहे. लवकरच नोंदणी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील दोन-तीन दिवसांत समस्या सुटेल. - समीर सहाय, निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन (नोडल अधिकारी)