मुंबई – देशात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवाशांना आपापल्या राज्यात पोहचवण्यासाठी रेल्वेकडून श्रमिक स्पेशल ट्रेन चालवण्यात येते. महाराष्ट्रातून आतापर्यंत ६-७ लाख मजुरांचे पलायन झाले आहेत. अद्यापही रेल्वेकडून दिवसाला ८० ट्रेनची आवश्यकता असताना केवळ ५० टक्के म्हणजे ४० ट्रेन पाठवल्या जातात असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे केला. यावरुन आता रेल्वेमंत्री विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष ट्विटरवरुन पाहायला मिळत आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी राज्यासाठी १२५ ट्रेन देण्यात तयार आहोत. राज्य सरकारने अडकलेल्या मजुरांची यादी तात्काळ रेल्वेला पाठवण्याचं आवाहन केले होते. रेल्वेमंत्र्यांनी याबाबत ३ ट्विट केले त्यानंतर रात्री १२ वाजता पीयूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करुन रात्रीचे बारा वाजले आहेत आणि ५ तासांनंतरही आमच्याकडे महाराष्ट्र सरकारकडून उद्याच्या १२५ ट्रेनची माहिती आणि प्रवाशांची यादी आली नाही. तरीही मी अधिकाऱ्यांना प्रतिक्षा करा आणि तयारी सुरु ठेवा असा आदेश दिल्याचं त्यांनी सांगितले.
त्यानंतर मध्यरात्री २ च्या सुमारास केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी आम्ही १२५ ट्रेनची तयारी केली असताना महाराष्ट्र सरकारने ४६ गाड्यांची यादी पाठवली असून त्यापैकी ४१ ट्रेन सोडाव्या लागतील कारण उर्वरित ट्रेन पश्चिम बंगाल आणि ओडिसा याठिकाणच्या आहेत. तिथे अम्फान चक्रीवादळामुळे ट्रेन चालवण्यास परवानगी नसल्याचं पियूष गोयल यांनी सांगितले.
दरम्यान त्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास आवश्यक असणाऱ्या गाड्यांची यादी सादर केली आहे. फक्त केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच ठिकाणी पोहचू द्या, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहचू नये अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला होता.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
राज्यात अडकलेल्या मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी दररोज ८० रेल्वे गाड्या हव्या आहेत. मात्र आम्हाला केवळ ३० ते ४० गाड्याच दिल्या जात आहेत. आमच्याकडे मजुरांची यादी तयार आहे. पण गाड्याच उपलब्ध करून दिल्या जात नाहीत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
अडीच तास होऊन गेले, पण मजुरांचा तपशील मिळेना; रेल्वेमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; स्थलांतरित कामगारांना परत बोलवायचं असेल तर...
चिनी सैन्याने तंबू ठोकल्याने लडाख सीमेवर वाढता तणाव; भारतीय सैन्याचाही आक्रमक सतर्कतेचा पवित्रा