लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : वाढत्या कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन लावले जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योग क्षेत्रास दिली आहे. देेशातील आरोग्य सुविधांत वाढ करून वृद्धीची गती कायम ठेवण्यास सरकारचे प्राधान्य राहील, असेही त्यांनी सांगितले.
सूत्रांनी सांगितले की, कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर देशव्यापी लॉकडाऊन लागू शकते की काय, अशी भीती उद्योग क्षेत्राकडून व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी उद्योग क्षेत्रातील संघटना आणि नेत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी त्यांनी वरील ग्वाही दिली.
सीतारामन यांनी एक ट्विट करून आपल्या चर्चेची माहिती जाहीर केली. त्यांनी सांगितले की, विविध व्यवसाय व चेंबरच्या नेत्यांशी मी फोनवर बोलले आहे. त्यांचे प्रश्न समजून घेतले तसेच सरकार विविध पातळ्यांवर करीत असलेल्या कामाची माहिती त्यांना दिली. लोकांचे जीव आणि रोजगार वाचावेत, यासाठी राज्य सरकारांना सोबत घेऊन आम्ही काम करीत आहोत. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय अगरवाल यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला करतानाच अर्थव्यवस्थेची गती कायम ठेवण्यासाठी सरकार विविध उपाय करीत आहे,
लाॅकडाऊन परवडणारे नाहीएका माहितगार अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या वर्षी ६८ दिवसांचे देशव्यापी लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्याचा फटका बसून अर्थव्यवस्था २०२०-२१च्या पहिल्या तिमाहीत २४.४ टक्क्यांनी, तर दुसऱ्या सहामाहीत ७.३ टक्क्यांनी घसरली होती. या धक्क्यातून अर्थव्यवस्था सावरत असतानाच दुसरे लॉकडाऊन लावणे परवडणारे नाही, असे सरकारचे मत आहे.