लॉकडाउन हा उपाय नव्हे, ते ‘पॉज बटण’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 06:20 AM2020-04-17T06:20:56+5:302020-04-17T06:21:07+5:30
राहुल गांधी यांचे मत; जास्तीत जास्त लोकांच्या कोरोना चाचण्या कराव्यात
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : कोरोना साथीला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाउन हा उपाय असूच शकत नाही. लॉकडाउन उठले की विषाणूू पुन्हा त्याचे काम सुरु करेल, असे मत काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. यावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या लवकरात लवकर चाचण्या करायला हव्यात, असेही त्यांनी सुचविले.
व्हिडिओ पत्रकार परिषदेत बोलताना गांधी असेही म्हणाले की, मी देशातील व परदेशातीलही अनेक तज्ज्ञांशी बोललो. त्यांचेही म्हणणे असेच आहे. ‘लॉकडाउन’मुळे आरोग्य यंत्रणा सज्ज करायला थोडी उसंत मिळते, एवढेच. ते असेही म्हण़ाले की, विषाणूपासून बचाव करण्याच्या नादात आपण देशाची अर्र्थव्यवस्था खड्ड्यात घालू शकत नाही. अशा प्रकारच्या साथीला रोखता येत नसते. ती पद्धतशीरपणे हाताळावी लागते.
ते पुढे म्हणाले की, ‘लॉकडाउन’ उठवितानाही विचारपूर्वक धोरण ठरवायला हवे. त्यासाठी तपासण्या हा मार्ग अनुसरावा लागेल. ‘हॉटस्पॉट’ व बिगर ‘हॉटस्पॉट’ असे वर्गीकरण करून चाचण्यांचा वेग वाढवावा लागेल.
‘लॉकडाउन’ वाढविल्याने आधीच अडचणीत असलेल्या स्थलांतरित कामगारांचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. उपासमार ही त्यांची सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सरकारने धान्याची कोठारे खुली करायला हवीत, असेही त्यांनी आग्रही प्रतिपादन केले.
ही भांडण्याची वेळ नाही
राहुल गांधी असेही म्हणाले की, अनेक बाबतीत माझे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मतभेद असू शकतात. पण ही वेळ ते मतभेद उगाळत भांडत बसण्याची नाही. कोरोनाविरुद्ध सर्वांनी एकदिलाने लढा द्यायला हवा. भांडत बसलो तर आपल्याला यश येणार नाही.