नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील १४ ते २९ लाख लोक या संसर्गाची बाधा होण्यापासून बचावले तसेच आणखी ३७ ते ७८ हजार जणांचे मृत्यू रोखले गेले, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केला आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत त्यांनी सांगितले की, देशात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय सुविधा वाढविण्याकरिता लॉकडाऊनच्या चार महिन्यांचा उपयोग करण्यात आला. पीपीई, एन-९५ मास्क, व्हेंटिलेटर यांचे उत्पादन वाढविण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले. विलगीकरण कक्षांसाठी खाटांची संख्या लॉकडाऊनच्या काळात ३६.२ पटीने वाढविण्यात आली. त्याआधी मार्च महिन्यात हीच संख्या २४.६ पटीने वाढविण्यात आली होती.लाखो खाटांची केली सोय१२ सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी लक्षात घेतली तर देशभरात १५,२८४ कोरोना उपचार केंद्रे स्थापन करण्यात आली असून त्यात आॅक्सिजन पुरवठ्याची सोय नसलेल्या १३,१४,६४६ खाटा उपलब्ध आहेत.आॅक्सिजन पुरवठ्याची सोय असलेल्या २,३१,०९३ खाटा, अतिदक्षता विभागांतील ६२,७१७ खाटा तसेच ३२,५७५ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.मृत्यूचे प्रमाण जगात सर्वांत कमी : डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, दर १० लाख लोकांमागे कोरोनाच्या रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण अनुक्रमे ३,३२८ व ५५ इतकेकमी राखण्यात भारताला यश आले आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत हे सर्वांत कमी प्रमाण आहे. कोरोना रुग्णांची संख्या व बळी यांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, आसाम, ओडिशा, केरळ, गुजरात या राज्यांमध्ये आहे.सुरुवातीला देशात पीपीई बनण्याचे प्रमाण अगदीच कमी होते. मात्र आता या साधनांच्या निर्मितीबाबत आपण स्वयंपूर्ण झालो आहोत.- डॉ. हर्ष वर्धन,केंद्रीय आरोग्यमंत्री
लॉकडाऊनमुळे कोरोनापासून वाचले १४ ते २९ लाख लोक, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 3:20 AM