मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरातील देशांमध्ये सुरु झाला अन् अद्याप माहिती नसलेला लॉकडाऊन हा शब्द परवलीचा झाला. पंतप्रधाननरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांचा पहिला लॉकडाऊन जाहीर केला, तेव्हापासून लॉकडाऊन हा शब्द कानावर ऐकल्याशिवाय किंवा मुखातून उच्चारल्याशिवाय एकही दिवस गेला नसेल. अक्षरश: या एका शब्दाने कित्येकांना रडवलंय, कित्येकांना संकटात टाकलंय, कित्येकांचं आर्थिक नुकसानही केलंय. त्यामुळे लॉकडाऊन कधी संपुष्टात येईल, याची वाट प्रत्येकजण पाहत होता. अखेर, केंद्र सरकारने नवीन नियमावली जाहीर करताना परिपत्रकातून लॉकडाऊन हा शब्द हटवलाय. यापुढे तीन टप्प्यात लॉकडाऊन हटविण्यात येणार आहे, त्याअुषंगाने सरकारने Unlock हा शब्द जोडला आहे.
देशात कोरोना आला अन् येताना क्वारंटाईन, लॉकडाऊन हे शब्द देऊन गेला. अनिवासी भारतीयांपासून गाव खेड्यातील माणसांपर्यंत सर्वांनाच क्वारंटाईन अन् लॉकडाऊन हे शब्द परिचयाचे आणि दैनंदिन जीवन जगण्याचे बनले. त्यात, लॉकडाऊन या शब्दाची भीतीच जणू सर्वसामान्य नागरिकांमध्ये बसली होती. व्यापारी वर्गाला लॉकडाऊन हा शब्दच आवडत नसेल, तर मजूर, कामगारांनाही या शब्दाची प्रचंड चीड आली असेल. कारण, पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊननंतर पुन्हा दुसरा, तिसरा, चौथा आणि आता पाचवा लॉकडाऊन अनेकांसाठी त्रासदाय ठरला.
देशाच्या इतिहासात प्रथमच ६५ दिवस बंद असलेला आपला देश आता हळू हळू पूर्वपदावर येत आहे. मोदींनी जाहीर केलेल्या पहिल्या लॉकडाऊनपासून तो लॉकडाऊन संपण्याची वाट प्रत्येकजण पाहात होता. आता, सरकारच्या परिपत्रकातून हा लॉकडाऊन गायब झाला आहे. या लॉकडाऊनची जागा आता Unlock 1 या शब्दाने घेतली आहे. त्यासोबतच, Re-opening हाही शब्द परिपत्रकात वापरण्यात आला आहे. चीड अन् संताप आणणाऱ्या लॉकडाऊनऐवजी हे दोन नवे शब्द आशादायी वाटणारे आहेत. इतके दिवस कुलूपबंद झालेला देश आता अनलॉक होऊ लागलाय. त्यामुळे लॉकडाऊनला मागे टाकून भारत एक पाऊल पुढे आल्याचे हे संकेत आहेत. कोरोनाविरुद्धची लढाई लढताना, आता पुन्हा नव्या जोमाने, नव्या जोशाने आणि नवी ऊर्जा घेऊन भारतीय नागरीक मैदानात उतरणार आहे.