परभणी : स्वत:चे घर असावे अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा, स्वप्न असते. स्वातंत्र्यानंतरही गरीबांची घराची इच्छा पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून वर्ष 2022 पर्यंत समाजातील सर्व घटकांना हक्काचे पक्के घर देण्यात येणार असून सर्वांसाठी घरे हेच माझे स्वप्न व संकल्प असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे दिली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरासाठी एखाद्या व्यक्तीने पैशाची मागणी केल्यास जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार नोंद करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आज सकाळी 9.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हीडिओ कॉन्फरन्स कक्षामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजनेतील 15 लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून थेट संवाद साधला. यावेळी बैठक कक्षामध्ये जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रताप सवडे, जिल्हा सूचना अधिकारी सुनिल पोटेकर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या जीवनात झालेला बदल प्रत्यक्ष लाभार्थ्यांकडून ऐकणे खूप महत्वाचे असते. ज्या लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला, त्यांनी प्रकट केलेल्या भावना मनाला समाधान मिळवून देत असून त्यामुळे अधिक उत्साहाने काम करण्यास प्रेरणा मिळत असते. वर्ष 2022 पर्यंत गाव व शहरातील प्रत्येक गरीबाकडे स्वत:चे पक्के घर असेल त्याबरोबरच त्यात शौचालय, पाणी, वीज आणि स्वयंपाकाचा गॅसही त्यांना उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची नि:संदिग्ध ग्वाही त्यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे येणाऱ्या काळात ग्रामपातळीवर 3 कोटी तर शहरी भागात 1 कोटी घरे देण्यात येणार असल्याचे सांगून समाजातील आदिवासी, गरीब,अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व्यक्तींना या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी एखाद्या व्यक्तीने पैशाची मागणी केल्यास जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार नोंद करण्याचे आवाहनही त्यांनी केले.