नवी दिल्ली - देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या. एक्झिट पोलनुसार देशात कोणाची सत्ता येईल याचे अंदाजही वर्तविले गेले. यातून एनडीए पुन्हा सत्तेत येणार अशी शक्यता दिसून येते. सरासरी 300 आकडा एनडीए पार करेल असं बोललं जातं. 5 वर्षाची सत्ता दिल्यानंतर जनतेने पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच का पसंती दिली असेल त्याची अनेक कारणे आहेत.
- देशभक्ती
भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने देशभक्तीचा मुद्दा प्रचारात आणला. विरोधी पक्ष देशभक्तीच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत होते. मात्र भारतीय जनता पार्टीने प्रचाराच्या शेवटपर्यंत देशभक्ती हा मुद्दा आक्रमकपणे निवडणुकीच्या अजेंड्यावर ठेवला. पंतप्रधानांच्या प्रत्येक भाषणांमध्ये राष्ट्रवाद हवा की परिवादवाद हा मुद्दा असायचा.
- राष्ट्रीय सुरक्षा
देशाला दहशतवाद्यांपासून धोका आहे. या दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी मोदी सरकारने आक्रमक पाऊलं उचलली. त्यामुळे देश सुरक्षित राहिला. आज दहशतवादी भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करु शकत नाही हे प्रत्येक भाषणात नरेंद्र मोदी यांनी लोकांना सांगितले. दहशतवादासोबत नक्षलवाद्यांनाही चाप बसविण्यात सरकार यशस्वी ठरलं. नक्षलवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात आणण्याची भाषा केली गेली. राष्ट्रीय सुरक्षा हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक भाषणात वापरला गेला.
- दहशतवाद
दहशतवादाचं नाव काढलं तर पाकिस्तान समोर दिसतो. जर पाकिस्तानला चर्चा हवी असेल तर दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा अशी भूमिका देशातील सरकारने घेतली. दहशतवादाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानची पोल जगासमोर उघडी केली. पाकिस्तानातील दहशतवाद फक्त भारतासाठी नव्हे तर दक्षिण आशियाई देशांसाठी धोका आहे. दहशतवाद हा मुद्दा भारताने जगाच्या प्रत्येक देशापर्यंत पोहचवला. त्यामुळे जागतिक स्तरावर दहशतवादाच्या मुद्द्यावरुन अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिल्याचं नरेंद्र मोदींना भाषणात सांगितले.
- हिंदूत्त्व
हिंदूत्त्व हा मुद्दा भाजपाने प्रखरतेने भाषणात वापरला नसला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदीर, तसेच केदारनाथ-बद्रीनाथ येथील दौरे, गंगाघाटावर पूजापाठ, आरती यासारख्या कार्यक्रमातून हा मुद्दा दिसून आला. हिंदू दहशतवाद या शब्दावरुन विरोधकांना लक्ष्य करण्यात भाजपा यशस्वी झाली.
- स्वच्छता अभियान
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात स्वच्छता अभियानाचा मुद्दादेखील वापरला गेला. शौचालय, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे यासारख्या योजना नरेंद्र मोदींनी प्रतिष्ठेचा विषय केल्या. स्वच्छता अभियान हा देशातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला. घाणीचं साम्राज्य पसरलेल्या परिसरात स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता अभियानात अनेक महत्त्वाचे नेते, अभिनेते, सामान्य माणूसही जोडला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयात स्वच्छता अभियान याचा मोठा वाटा असेल.
एक्झिट पोल'चे अंदाज खरे ठरले; तर 'मोदीलाट-२' उसळण्याची 'ही' असतील 5 प्रमुख कारणं!
- आयुष्यमान भारत योजना
भाजपा आणि नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजना ही नवीन क्रांती असल्याचा प्रचार केला. आरोग्य क्षेत्रातील ही मोठी योजना आहे. देशातील अनेक गरिब लोकांना याचा लाभ होत आहे. आयुष्यमान भारत ही अशी योजना आहे ज्यामध्ये देशातील 50 करोडपेक्षा अधिक लोक जोडले गेले आहेत. त्यांना पाच लाखांपर्यंत विमा मिळेल. ही योजना यशस्वी झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केला. आरोग्याशी जोडलेली ही योजना लोकांशी जोडली गेली.
- उज्ज्वला योजना
मोदी सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेपैकी एक उज्ज्वला योजना ही आहे. गरिब लोकांच्या घरात गॅस सिलेंडर देण्याची ही योजना आहे. चुलीवर जेवण बनवावं लागल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. जळणासाठी लाकडे आणावी लागतात. ज्यामध्ये वेळ जास्त जातो आणि मेहनतही जास्त लागते. जेवण बनविताना होत असलेल्या धुरांमुळे आरोग्यही धोक्यात येते. मोदी सरकारची ही योजना ग्रामीण महिलांसाठी लाभदायक ठरली. मोदींनी या योजनेचा चांगला प्रचार केला. मन की बातमधून या योजनेच्या लाभार्थ्यांसोबतही मोदींनी चर्चा केली.
- भ्रष्टाचार
भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी भ्रष्टाचार सर्वात मोठा निवडणुकीच्या प्रचारात होता. मागील सरकारमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारात वापरला गेला. त्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात राफेलव्यतिरिक्त एकही मुद्दा विरोधकांनी मोदींच्या विरोधात वापरला नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर टीका केली होती.
- विरोधकांची भ्रष्ट आघाडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात विरोधकांच्या आघाडीला भ्रष्ट आघाडी एकत्र आल्याची टीका म्हणून संबोधण्यात आलं. जे घराणेशाहीला चालना देतात, जामीनावर बाहेर आहेत, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागलेत ते सर्व मिळून आघाडी केली आहे. एकीकडे विरोधकांची ही आघाडी तर दुसरीकडे एकटे नरेंद्र मोदी अशी ही लढाई असल्याचा प्रचार मोदींनी केला.
- सुशासन
नरेंद्र मोदी यांच्या काळात प्रशासकीय विभाग शिस्तबद्धपद्धतीने काम करायला लागली. लोकांची अनेक कामे होऊ लागली. भ्रष्टाचार कमी झाला. यासारखे मुद्दे भाजपाकडून प्रचारात वापरण्यात आले.