नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक्झिट पोलच्या माध्यमातून विविध वृत्तवाहिन्यांनी निकालांचे अंदाज वर्तवले आहेत. या एक्झिट पोलमध्ये देशातील सर्वाधिक खासदारांच्या तुलनेत तिसऱ्या नंबरवर असलेलं राज्य बिहारमध्ये भाजपाला चांगलं यश मिळताना पाहायला मिळत आहे. बहुतांश एक्झिट पोलमधून देशात एनडीए पुन्हा बहुमत मिळवेल असं चित्र दिसतंय. मात्र भाजपाला किती जागा मिळतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.
बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहे. याठिकाणी रामविलास पासवान, नितीश कुमार यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवत आहे. त्यामुळे बिहारमध्ये जेडीयू, भाजपा, एलजेपी यांना 40 पैकी 30 जागा मिळतील असा अंदाज टाईम्स नाऊ-वीएमआर यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात दाखवत आहे. तर काँग्रेस, राजद आणि अन्य पक्ष यांना 10 जागा मिळतील असं दाखविण्यात येत आहे.
मतांची टक्केवारी पाहिली तर एनडीएला मागील लोकसभेच्या तुलनेत कमी मतदान होताना दिसत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 51.5 टक्के तर यूपीएला 32.8 टक्के आणि इतरांना 15.7 टक्के मतदान झालं होतं. तर 2019 च्या निवडणुकीत एनडीएला 48.52 टक्के, यूपीएला 42.78 टक्के आणि इतरांना 8.7 टक्के मते मिळतील असं सांगितलं जात आहे. यूपीएच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ होत आहे तर एनडीएच्या मतदान टक्केवारीत 2.98 टक्के घट होत आहे. यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये एनडीएला 5 जागांचा फटका बसेल असा अंदाज आहे. मात्र प्रत्यक्ष निकाल 23 मे रोजी लागतील त्यानंतर चित्र स्पष्ट होईल.
बिहारच्या राजकारणात यंदाच्या निवडणुकीत अनेक फेरबदल झाल्याचं पाहायला मिळालं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूने मागील लोकसभा निवडणुकीत वेगळे लढल्याने त्यांना 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. एनडीएने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पुढे केल्यानंतर नितीश कुमार यांनी एनडीएशी फारकत घेतली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांची जेडीयू आणि लालूप्रसाद यादव यांची आरजेडी यांनी एकत्र येत राज्यात सत्ता मिळवली होती. पण आरजेडी-जेडीयू आघाडी फार काळ टिकली नाही त्यानंतर जेडीयूने पुन्हा भाजपाशी घरोबा करत राज्यात सत्ता स्थापन केली. यंदाच्या निवडणुकीत जेडीयू 17, भाजपा 17 जागांवर लढत आहे. त्यामुळे निकालांमध्ये भाजपाला किती यश मिळते हे पाहणे गरजेचे आहे.