कूचबिहार - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या कूचबिहारमधील प्रचारसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांनी 'ममतांची 'माँ-माटी-मानुष' ही घोषणा तद्दन खोटी आहे. राजकीय फायद्यासाठी घुसखोरांना वाचवून त्यांनी मातीसोबत विश्वासघात केला आहे. पश्चिम बंगालच्या लोकांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या हवाली करून त्यांनी माणसांच्या अपेक्षांचा भंग केला आहे आणि सर्वांना अडचणीत टाकलं आहे' असं म्हटलं आहे. कूचबिहारमध्ये रविवारी (7 एप्रिल) एका प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
पश्चिम बंगाल राज्याच्या विकासात ममता बॅनर्जी स्पीड ब्रेकर ठरत आहेत, असा टोलाही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी लगावला आहे. 'इतर राज्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये गतीने विकास होऊ शकला नाही हे खरं आहे. याचं कारण पश्चिम बंगालमध्ये स्पीड ब्रेकर आहे ज्याला दीदी म्हणून ओळखलं जातं. त्यांना गरिबी हटवायची नाही आहे. जर गरिबी संपली तर त्यांचं राजकारणही संपेल. त्यांना गरिबी पाहायची आहे आणि यामुळे त्यांनी गरिबांसाठी सुरू असणारे विकास प्रकल्प थांबवले आहेत' अशी टीका मोदींनी केली आहे. ममता अस्वस्थ झाल्या आहेत. त्या खूप घाबरल्या असून, त्यांची झोप पुरती उडाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
नरेंद्र मोदी यांनी 'स्पीड ब्रेकर दीदींनी केंद्राच्या योजना रोखल्या नसत्या तर, आज अनेक योजनांचा तुम्हाला लाभ मिळाला असता. आता याच दीदींना धडा शिकवण्यासाठी या लोकसभा निवडणुका आल्या आहेत. तुम्ही केंद्रात आम्हाला बळकट केलंत तर दीदींना झुकावं लागेल आणि तुमच्यासाठी विकासकामे करावीच लागतील. त्यांची मनमानी आता चालणार नाही, हे त्यांना समजेल' असंही म्हटलं आहे. तसेच दीदींचा खरा चेहरा जगासमोर आणणं गरजेचं आहे. त्या पश्चिम बंगालची संस्कृती, येथील नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
पुन्हा सत्तेवर आल्यास मोदी क्रूरकर्मा बनतील
आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाची सत्ता दिली तर मोदी क्रूरकर्मा हुकूमशहा होतील, अशी प्रखर टीका तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. प. बंगालच्या विकासात ममता आणि तृणमूल गतिरोधक आहेत, या मोदींच्या व्यक्तिगत टीकेला ‘यापुढे मी मोदींना पंतप्रधान न म्हणता ‘एक्स्पायरी बाबू (मुदत संपलेला नेता) म्हणेन, असा प्रतिटोला हाणला होता. कूचबिहार येथील सभेत तोच आक्रमकपणा कायम ठेवत ममता यांनी असाही आरोप केला होता की, आताही मोदींच्या लुटा, दंगली करा व ठार मारा याच तीन मुख्य घोषणा आहेत. पुन्हा सत्तेवर आल्यास ते राज्यघटना गुंडाळून ठेवतील आणि याहीपेक्षा क्रूरकर्मा हुकुमशहा बनून लोकशाहीला एकाधिकारशाहीत बदलून टाकतील. ममता असेही म्हणाल्या की, चहावाल्याला या देशाने पंतप्रधान केले, असे म्हणून मोदींनी सुरुवातीस भरपूर आत्मस्तुती करून घेतली. पण चहावाल्याला आश्वासने पूर्ण करणे जमले नाही, तेव्हा त्याने ‘मै मी चौकीदार’ ही लोकांना उल्लू बनविण्याची नवी टूम काढली आहे.