Lok Sabha 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या INDIA आघाडीत अद्याप जागावाटपाबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. तरीदेखील समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 11 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सपाने बसपा खासदार अफजल अन्सारीला गाझीपूरमधून उमेदवारी दिली आहे. याशिवाय मुझफ्फरनगरमधून हरेंद्र मलिक, आमलामधून नीरज मौर्य, शाहजहांपूरमधून राजेश कश्यप, हरदोईमधून उषा वर्मा, मिश्रीखमधून रामपाल राजवंशी, प्रतापगढमधून एसपी सिंह पटेल, बहराईजमधून रमेश गौतम, गोंडामधून श्रेया वर्मा आणि चंदौलीमधून वीरेंद्र सिंग यांना तिकीट दिले आहे. विशेष म्हमजे, सपाने यापूर्वी 16 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
सध्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा मुक्काम उत्तर प्रदेशात आहे. राहुल गांधी उद्या अमेठी आणि रायबरेलीत यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. मात्र यात अखिलेश यादव यांच्या सहभागावर संशय कायम आहे. आधी जागावाटप झाला पाहिजे, अशी सपाची भूमिका आहे, पण अद्याप काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. आता सपाने आपले उमेदवार जाहीर करुन काँग्रेसला अडचणीत आणले आहे. कारण, काँग्रेसने प्रतापगड लोकसभा जागेवर दावा केला होता, पण सपाने येथून आपला उमेदवार जाहीर केला.
विशेष म्हणजे, समाजवादी पक्षाने यापूर्वी 30 जानेवारी रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये 16 उमेदवारांची नावे जाहीर होती. पहिल्या यादीनुसार पक्षाने मैनपुरीमधून डिंपल यादव, संभलमधून शफीकुर रहमान बुर्क, लखनऊ लोकसभा मतदारसंघातून रविदास मेहरोत्रा, अक्षय यादवांना फिरोजाबाद आणि धर्मेंद्र यादवांना बदायूंमधून उमेदवारी दिली आहे. आता काँग्रेस काय निर्णय घेणार, जागावाटपाबाबत अंतिम चर्चा कधी होणार, हे पाहणे महत्वाचे आहे.