लोकसभा 2024; जगातील सर्वात महागडी निवडणूक, 2019 च्या तुलनेत दुप्पट खर्च...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 07:33 PM2024-04-25T19:33:22+5:302024-04-25T19:33:46+5:30
Lok Sabha Election 2024 :निवडणुकीवर होणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खर्चाचे आकडे पाहून चक्रावून जाल...
Lok Sabha Election 2024 : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धूम सुरू आहे. एकूण सात टप्प्यात विविध ठिकाणी मतदान होणार असून, 4 जून रोजी निकाल लागेल. सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताची निवडणूकदेखील तितकीच मोठी आहे. या निवडणुकीवर हजारो-लाखो रुपयांचा खर्च केला जातोय. NGO सेंटर फॉर मीडिया स्टडीज (CMS) ने दावा केला आहे की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अंदाजे 1.35 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम 2019 च्या निवडणुकीत झालेल्या खर्चाच्या दुप्पट आहे.
एनजीओने सांगितल्यानुसार, मागील लोकसभा निवडणुकीत, 2019 साली सुमारे 60,000 कोटी रुपये खर्च झाले होते.संस्थेचे अध्यक्ष एन भास्कर राव यांनी सांगितले की, या सर्वसमावेशक खर्चामध्ये राजकीय पक्ष, उमेदवार, सरकार आणि निवडणूक आयोगासह निवडणुकीशी संबंधित सर्व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खर्चाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही संस्था गेल्या 35 वर्षांपासून निवडणूक खर्चाचा मागोवा घेत आहे.
राव पुढे म्हणाले की, आम्ही सुरुवातीला 1.2 लाख कोटी रुपये खर्चाचा अंदाज लावला होता. पण, इलेक्टोरल बाँड्सची माहिती उघड झाल्यानंतर आम्ही हा आकडा 1.35 लाख कोटी रुपये केला आहे.
अज्ञात स्त्रोतांकडून 60 टक्के निवडणूक निधी...
सोसायटी फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अलीकडील निरीक्षणातून भारतातील राजकीय निधीमध्ये पारदर्शकतेचा लक्षणीय अभाव दिसून आला आहे. त्यात दावा करण्यात आला आहे की, 2004-05 ते 2022-23 पर्यंत देशातील सहा प्रमुख राजकीय पक्षांना सुमारे 60 टक्के निधी(एकूण 19,083 कोटी रुपये) अज्ञात स्त्रोतांकडून आले आहेत, ज्यात निवडणूक रोख्यांमधून मिळालेल्या पैशांचा समावेश आहे.