Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांच्या नजरा सत्ता स्थापनेवर लागल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठता न आल्यामुळे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची साथ लागणार आहे. अशातच, नितीश कुमार भाजपवर चार ते पाच मंत्रिपदासाठी दबाव टाकत असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेडीयूच्या अनावश्यक मागण्यांपुढे भाजप झुकणार नसल्याचे समोर आले आहे. युतीचे नियम आणि युतीच्या धर्मात राहूनच भाजप काम करेल. मंत्र्यांची विभागणी असो की, मंत्र्यांची संख्या असो, इतर सहकाऱ्यांचाही विचार केला जाणार नाही. तसेच, या अशा दबावातून बाहेर पडण्यासाठी भाजप इतर अपक्ष खासदार आणि छोट्या पक्षांशी संपर्क साधत आहे.
असे सांगण्यात येत आहे की, नितीश कुमार यांनी भाजपसमोर मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठेवला आहे. त्यानुसार, त्यांना प्रत्येक 4 खासदारांमागे एक मंत्रिपद हवंय. त्यांच्याकडे 12 खासदार आहेत, म्हणजेच त्यांना मंत्रिमंडळात 3 मंत्रिपदे हवी आहेत. तर, दुसरीकडे चंद्राबाबू नायडूदेखील अशाच प्रकारचा फॉर्म्युला भाजपसमोर ठेवत आहेत. त्यांच्याकडे 16 खासदार आहेत, म्हणजेच त्यांनादेखील 4-5 मंत्रिपदे आणि लोकसभा अध्यक्षपद हवे आहे. आता भाजप कुणाला किती मंत्रिपदे देणार, हे येणाऱ्या काळात कळेल.