Lok Sabha 2024: लोकसभा 2024 साठी काँग्रेसला पाठिंबा देऊ, पण...; ममता बॅनर्जींनी घातली अट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 07:54 PM2023-05-15T19:54:39+5:302023-05-15T19:55:11+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी ममता बॅनर्जी सोबत यायला तयार झाल्या आहेत.
Lok Sabha 2024: गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्रातील भाजप सरकारविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटत आहेत. पण, अनेकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारण्यास नकार दिला आहे. पण, आता कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्यास सहमती दर्शवली आहे. ममता बॅनर्जी म्हणतात की, ज्या राज्यांमध्ये काँग्रेस मजबूत आहे, तिथे TMC काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार आहे. त्याबदल्यात बंगालमध्ये काँग्रेसला टीएमसीला मदत करावी लागेल.
अनेक ठिकाणी भाजप कमजोर
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी TMC प्रमुख ममता बॅनर्जी सर्व विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरू करू इच्छितात. राज्य सचिवालय नबन्ना येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्या म्हणाल्या, 'मी जादूगार नाही, ज्योतिषीही नाही. भविष्यात काय होईल हे मी सांगू शकत नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकते की, जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत, तिथे भाजप लढू शकत नाही. कर्नाटकात दिलेली मते ही भाजप सरकारच्या विरोधातला जनादेश आहे.
#WATCH | Wherever a regional political party is strong there BJP cannot fight. The parties which are strong in a particular region should fight together. I am supporting Congress in Karnataka but it should not fight against me in Bengal: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/wIazux6oKq
— ANI (@ANI) May 15, 2023
सर्वांना सोबत काम करावे लागेल
त्या पुढे म्हणाल्या, देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, लोकशाहीचे हक्क बुलडोझरने चिरडले जात आहेत. त्यामुळे या स्थितीत परिसरात जो कोणी ताकदवान असेल त्यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. समजा आपण बंगालमध्ये बलवान आहोत, तर बंगालमध्ये लढूया. काँग्रेसने दिल्लीत लढावे. नितीश जी आणि तेजस्वी बिहारमध्ये एकत्र आहेत. त्याचप्रमाणे इतर राज्यांमध्येही आपल्याला एकत्र काम करावे लागेल. ज्या जागांवर काँग्रेस पक्ष मजबूत आहे, त्या जागांवर ते भाजपशी लढू शकतात. जिथे काँग्रेस पक्ष मजबूत असेल तिथे आमचा पाठिंबा असेल. मात्र त्यासाठी काँग्रेसला इतर पक्षांनाही साथ द्यावी लागेल.
काँग्रेस 200 जागांवर मजबूत
ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, आम्ही माहिती काढल्याप्रमाणे काँग्रेस 200 जागांवर मजबूत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला काही चांगले मिळवायचे असेल तर त्यांना काही क्षेत्रात त्याग करावा लागेल. समजा यूपीमध्ये अखिलेश यादवांना प्राधान्य द्यावे लागेल. काँग्रेसने तिथे लढू नये असे मी म्हणत नाही, पण बैठक घेऊन बोलणे आवश्यक आहे, असंही त्या यावेली म्हणाल्या. त्यांच्या या प्रतिक्रियेतून विरोधी ऐक्यासाठी ममता तयार असल्याचे दिसून येत आहे.