By Election Result: हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थानमधील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला जोरदार दणका, काँग्रेस, तृणमूल काँग्रेसची मुसंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 01:41 PM2021-11-02T13:41:11+5:302021-11-02T13:45:51+5:30
By Election Result Update: देशातील विविध राज्यांमधील २९ विधानसभा आणि ३ लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीमध्ये BJPला जोरदार धक्का बसला आहे. तर Congress, Trinamool Congress, Shiv Sena हे पक्ष बाजी मारताना दिसत आहेत.
नवी दिल्ली - देशातील विविध राज्यांमधील २९ विधानसभा आणि ३ लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील पोटनिवडणुकीत भाजपाचे सर्व उमेदवार पिछाडीवर पडले आहेत. प्रतिष्ठेच्या केलेल्या महाराष्ट्रातील देगलूर-बिलोली विधानसभा आणि केंद्रशासित दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतही भाजपाची पिछेहाट झाली आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार हिमाचल प्रदेशमधील तीन विधानसभा आणि एक लोकसभा, राजस्थानमधील दोन विधानसभा आणि पश्चिम बंगालमधील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपा पिछाडीवर पडला आहे. पैकी हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसने मुडंडी मारली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूक काँग्रेसने भाजपाची दाणादाण उडवली आहे.
महाराष्ट्रातील एका विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतही भाजपा उमेदवार पिछाडीवर पडला आहे. येथे काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी आघाडी घेतली आहे. त्याशिवाय दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीतही भाजपाचा उमेदवार पराभवाच्या छायेत आहे. येथे शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी विजयाच्या दिशेने कूच केली आहे.
दरम्यान, आसाममधील तीन विधानसभा आणि मध्य प्रदेशमधील दोन विधानसभा आणि एका लोकसभा मतदारसंघात भाजपा आघाडीवर आहे. तर कर्नाटक आणि तेलंगाणामधील प्रत्येकी एका जागेवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर बिहारमध्ये अटीतटीची लढत होत असून, येथे भाजपाचा मित्रपक्ष असलेला जेडीयू एका जागेवर तर लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी एका जागेवर आघाडीवर आहे.