नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरु आहे. तर, काही उमेदवारांनी आपले तिकीट कापले जाण्याच्या भीतीने पक्षाला अल्टीमेटम द्यायला सुरुवात केली आहे.
नुकतेच भाजपाचे उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज यांनी तिकीट कापण्याच्या भीतीने पक्षाला एकप्रकारे इशारा दिला. मात्र, याबाबत आता त्यांनी यूटर्न घेतला आहे. साक्षी महाराज म्हणाले, 'मी पक्षासोबत आहे आणि यापुढेही राहणार. मला उन्नावमधून तिकीट मिळणार आहे, याची कल्पना आहे. मला तिकीट भेटले नाही, तरी मी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार आहे.'
गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाकडून अनेक विद्यमान खासदारांचा आगामी लोकसभा निवडणुकीत पत्ता कट होणार असल्याचे सांगण्यात आले होते. यामध्ये साक्षी महाराज यांचेदेखील नाव असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर साक्षी महाराज यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र नाथ पांडेय यांना पत्र लिहिले की, मी उन्नावमध्ये येण्यापूर्वी जिल्ह्यात मागील दहा वर्षांत भाजपाचा एकही विधानसभा सदस्य नव्हता. परंतु, आज भाजपाचे सहा आमदार आणि एक विधान परिषद सदस्य आहे. पक्षाने आपल्याविरुद्ध काही निर्णय घेतल्यास, याचा देश आणि राज्यातील लाखो कार्यकर्त्यांवर मोठा परिणाम होईल, ज्याचा परिणाम नक्कीच चांगला नसेल, असे साक्षी महाराज यांनी म्हटले होते.
दरम्यान, आपल्या बेताल वक्तव्यामुळे साक्षी महाराज नेहमीच चर्चेत असतात. तसेच भाजपाकडून एखाद्या मुद्द्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे आणि त्याचे समर्थन करणारे म्हणूनही साक्षी महाराज यांची ओळख आहे.