लखनऊः विरोधकांची एकी भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते, हे उत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणुकीत पुन्हा स्पष्ट झालं आहे. कैराना लोकसभा मतदारसंघात वहिनी-भावोजींच्या 'युती'मुळे भाजपाला पराभवाचा धक्का बसलाय. राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सूम यांनी सर्व भाजपाविरोधकांच्या पाठिंब्याच्या जोरावर या पोटनिवडणुकीत बाजी मारली आहे. परंतु, खऱ्या अर्थानं त्यांचे भावोजी - कंवर हसन यांनी भाजपाचा 'खेळ खलास' केला, असं म्हणावं लागेल.
कैराना लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रीय लोक दलानं तबस्सूम यांना तिकीट देताच, सर्व भाजपाविरोधक त्यांच्या बाजूने उभे राहिले होते. काँग्रेस, बसपा, सपानं त्यांना समर्थन दिलं होतं. परंतु, तबस्सूम यांचे भावोजी कंवर हसन अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यानं भाजपाला मोठा आधार मिळाला होता. मुस्लिम मतांचं विभाजन त्यांच्या पथ्यावर पडणार होतं. परंतु, कंवर हसन यांनी मोक्याच्या क्षणी माघार घेतली. त्यांनी राष्ट्रीय लोक दलासोबत जाण्याची घोषणा केल्यानं भाजपाचं गणित विस्कटलं होतं. ते त्यांना पुन्हा जुळवताच आलं नाही. परिणामी, मृगांका सिंह यांना पराभव पत्करावा लागला. तबस्सूम यांची आघाडी हळूहळू वाढतच गेली आणि त्यांनी मोठ्या विजयाची नोंद केली.
भाजपाचे खासदार हुकूम सिंह यांचं फेब्रुवारी महिन्यात निधन झालं होतं. त्यांची कन्या मृगांका सिंह हिला भाजपाने उमेदवारी दिली होती. सहानुभूतीच्या लाटेचा तिला फायदा होईल, असा सरळ-साधा विचार भाजपानं केला होता. पण, विरोधकांच्या हातमिळवणीनं भाजपाच्या हातून एक जागा खेचून घेतली. याआधी, मार्च महिन्यात उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी सपा-बसपा एकत्र आले होते आणि भाजपाला आपले गड गमवावे लागले होते.