कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी बांगलादेशी अभिनेता फिरदौस अहमद यांना मैदानात उतरविले आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टी(भाजपा)कडून करण्यात येत आहे. यासंदर्भात भाजपाने नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी भाजपा नेता जे. पी. मजुमदार यांनी कोलकाता निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे.
भाजपा नेत्याने सांगितले की, 'नियमानुसार देशातील निवडणुकीत कोणताही विदेशी नागरिक भाग घेऊ शकत नाही. जर तृणमूल काँग्रेस आपल्या प्रचारासाठी बांगलादेशी नागरिकांचा वापर करत आहेत, तर त्यांच्याकडून नियमांची पायमल्ली होत आहे. त्या विदेशी नागरिकाला व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली पाहिजे.'
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील राजगंज मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार कन्हैयालाल अग्रवाल यांच्या प्रचारार्थ बांगलादेशी अभिनेता फिरदौस अहमद करताना दिसून आले. यावरुन पश्चिम बंगालमध्ये नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.