नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने मायावती यांच्यावर प्रचारबंदीची केलेली कारवाई संपल्यानंतर त्यांनी थेट निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारबंदीचे उल्लघंन करत आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल निवडणूक आयोगाला मायावती यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवरुन निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
निवडणूक आयोगाच्या प्रचारबंदीचे उल्लंघन करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शहरात, मंदिरांत आणि दलितांच्या घराबाहेर जाऊन जेवण करण्याचे नाटक करत आहेत. त्याचे प्रसारण मीडियामध्ये करुन निवडणूकीत लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्यावर आयोग दया का दाखवत आहे, असा सवाल मायावती यांनी केला आहे.जर असा भेदभाव आणि भाजपा नेत्यांच्या बाबतीत निवडणूक आयोग कानाडोळा करत असेल तर ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष होण्याची शक्यता कठिण आहे, असेही मायावती यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जातीयवादी विखारी प्रचार करून प्रचाराचे वातावरण कलुषित केल्याबद्दल निवडणूक आयोगाने सोमवारी भाजपाचे ‘स्टार प्रचारक’ व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यावर प्रचारबंदी लागू केली. योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रचारबंदी 72 तासांची (तीन दिवस) तर मायावती यांच्यावर 48 तासांची (दोन दिवस) बंदी घातली होती.
योगी आदित्यनाथ यांच्यावर 9 एप्रिल रोजी मेरठ येथील सभेत वादग्रस्त वक्तव्य करुन आदर्श आचारसंहितेचा भंग केला आरोप होता. तर मायावती यांनी 7 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील सहरानपूर येथील देवबंद येथील प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य करुन, आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. याप्रकरणी निवडणूक आयोगाने योदी आदित्यनाथ आणि मायावती यांच्यावर प्रचारबंदी बंदी घातली.