लोहितपूर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असतानाच नेतेमंडळींमधील वाकयुद्धही जोर धरू लागले आहे. आपल्या विरोधातील नेत्यांविरोधात टीका करताना सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह टीकाटिप्पणीसुद्धा केली जाऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. मात्र देशात एक अशी जागा आहे जिथे हे मतदान सुरूही झालं आहे. चकित झालात?... पण हे खरं आहे. भारत -तिबेट सीमा सुरक्षादलाच्या अरुणाचल प्रदेशमधल्या चौकीवर शुक्रवारी (5 एप्रिल) हे मतदान घेण्यात आलं.
भारत-तिबेटची ही सीमा अरुणाचल प्रदेशमधून जाते. लोहितपूरमध्ये पोस्टल मतदानाच्या माध्यमातून भारत-तिबेट सीमा पोलिसांनी (ITBP) मतदान केलं आहे. यामध्ये 80 पोलिसांचा समावेश होता. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूकही आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमधले मतदान दोन निवडणुकांसाठी मतदान करत आहेत. त्यासोबतच भारत - तिबेट पोलीस दलात देशभरातल्या विविध भागांतून आलेले पोलीस कर्मचारीही आहेत. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या उमेदवारांसाठी हे मतदान केलं आहे. ITBP च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआयजी सुधाकर नटराजन यांनी जवानांमध्ये सर्वप्रथम मतदान केलं आहे.
अरुणाचल प्रदेशमधील ITBP च्या दुसऱ्या युनिटमधील जवानही पोस्टल मतदान करणार आहेत. सरकारी अधिकारी, सैन्याचे जवान, अधिकारी, सशस्त्र पोलीस दल अशा सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यांना सर्व्हिस वोटर्स म्हटलं जातं. इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम या यंत्रणेच्या माध्यमातून ते आपलं मत नोंदवत आहेत. सर्व्हिस वोटर्ससाठी पश्चिम त्रिपुरा लोकसभा क्षेत्रात 8 एप्रिल आणि पूर्व त्रिपुरा क्षेत्रात 12 एप्रिलला होणाऱ्या पोस्टल मतदानासाठी जवळपास 7,000 बॅलेट पेपर्सचा वापर केला जाणार आहे.
जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले होते. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.
पोस्टल मतदानाचा टक्का वाढणार ; पोलिसांच्या मतदानातही होणार वाढ
लोकसभा निवडणूकीमध्ये अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा; या उद्देशाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विविध मोहिमा राबविल्या जात आहेत. लष्करात सेवेत असणाऱ्या जवानांपासून निवडणूकीचे काम करणारे अधिकारी कर्मचारी आणि बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांच्या मतदानाचा टक्क्का वाढविण्यासाठीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पोस्टल बॅलेटचा मतदानाचा टक्का वाढेल,अशी शक्यता निवडणूक प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जागृतीबाबत कार्यक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबरच प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जावून मतदान करता येऊ न शकणाऱ्या मतदारांना उपलब्ध असणाऱ्या पयार्यांची माहिती दिली जात आहे. पूर्वी पोस्टाने मतपत्रिका मतदाराला पाठविणे आणि मतदाराने पुन्हा मत मोजणीपूर्वी पोस्टाने पोहच करणे यात वेळ जात होता. त्यामुळे अनेकांना आपला मतदानाचा हक्क बजावता येत नव्हता. मात्र,मतदान आणि मतमोजणी यांच्यात तब्बल एक महिन्याचे अंतर आहे. त्यामुळे पोस्टाने पाठविलेली प्रत्येक मतपत्रिका मत मोजणीपूर्वी पोहचण्याची शक्यता वाढली आहे. त्याचप्रमाणे पोस्टल मतदान कसे करावे; याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेकडून पोलिसांसह महसूल व इतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.