अमित शाह यांच्याविरोधात लोकसभा लढविलेली; काँग्रेसच्या आमदाराचा राजीनामा, भाजपमध्ये जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 12:39 PM2024-01-19T12:39:12+5:302024-01-19T12:40:37+5:30
राजकोट जिल्हा काँग्रेस अध्यक्षांनी कार्यकर्त्यांसह नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. उत्तर गुजरातमधील एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसला राम-राम केले होते. यात आता विजापुरच्या आमदारांची भर पडली आहे.
लोकसभा निवडणूक जवळ येतेय तसा काँग्रेसमधील एक एक पत्ता निखळू लागला आहे. मुंबईत माजी खासदारांनी राजीनामा देत शिवसेनेची वाट धरल्यानंतर आता गुजरातमध्ये आमदाराने काँग्रेस पक्ष सोडला आहे. लवकरच भाजपात प्रवेश होणार आहे.
राजकोट जिल्हा काँग्रेस अध्यक्षांनी कार्यकर्त्यांसह नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. उत्तर गुजरातमधील एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेसला राम-राम केले होते. यात आता विजापुरच्या आमदारांची भर पडली आहे. विजापूरचे काँग्रेस आमदार सीजे चावडा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
चावडा यांना भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे ते येत्या ४ फेब्रुवारीला भाजपात प्रवेश करणार आहेत. साबरकांठा मतदारसंघातून ते निवडणूक लढवू शकतात. चावडा यांनी गांधीनगर गाठत गुजरात विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे आमदार पदाचा राजीनामा सोपविला.
चावडा यांनी 2002 मध्ये गांधीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि भाजपच्या वाडीभाई पटेल यांचा पराभव करून ते पहिल्यांदा आमदार झाले. 2007 ची विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजपच्या शंभूजी ठाकोरकडून 3748 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर २०१७ ला त्यांनी पुन्हा विजय मिळविला. २०१९ मध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात निवडणूक लढविलेली, त्याच त्यांचा पराभव झाला होता. २०२२ मध्ये ते पुन्हा आमदार झाले.