नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी अखेर भारतीय जनता पक्षाने गुरुवारी जाहीर केली. यामध्ये अधिक बदल न करता अनेक विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना भाजपने पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध अमेठीतून निवडणुकीच्या रिंगाणात उतरविले आहे.
स्मृती इराणी यांना अमेठीतून दुसऱ्यांदा तिकीट देण्यात आले आहे. गांधी कुटुंबियांचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या अमेठीतून स्मृती इराणी यांनी २०१४ मध्ये येथून निवडणूक लढविली होती. परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. या मतदार संघातून राहुल गांधी यांनी २००९ मध्ये ३ लाख ७० हजार मतांनी विजय मिळवला होता. परंतु २०१४ मध्ये राहुल यांची लीड १ लाख ७ हजार हजारांवर आली होती. यावरून स्मृती इराणी यांनी राहुल यांना तगडे आव्हान दिल्याचे स्पष्ट होेते. यावेळी देखील केंद्रीयमंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष यांच्यातील लढत चुरशीची होण्याचा अंदाज आहे.
स्मृती इराणी यांच्यासाठी जमेची बाब म्हणजे, येथून पराभूत झाल्यानंतर देखील त्यांनी अमेठीत आपला संपर्क कायम ठेवला. तसेच वेळोवेळी काँग्रेसला लक्ष्य केले. मागील पाच वर्षांत केंद्राय मंत्री असताना त्यांनी अनेकदा अमेठीचा दौरा केला. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे अमेठीच्या विकासाचे लक्ष नसल्याचे आरोप केले होते. आता परिस्थिती बदलली असली तर स्मृती इराणी यांनी अमेठीमध्ये वाढवलेला जनसंपर्क आणि केंद्रीय मंत्री म्हणून केलेले कामे यामुळे त्या काँग्रेस अध्यक्षांना तगडे आव्हान देतील हे स्पष्टच आहे.
दरम्यान २०१४ मध्ये मोदी लाट होती, परंतु आता तशी स्थिती नाही. त्यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेले राहुल आता काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहे. तसेच तीन राज्यात पक्षाला मिळवून दिलेल्या विजयामुळे राहुल यांची प्रतिमा उंचावली आहे. या दोन्ही बाबीकडे पाहिल्यास अमेठी येथील काँग्रेस अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्यातील ही लढत चांगलीच चुरशीची होणार असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तविला आहे.
उत्तर प्रदेशातील अमेठी मतदार संघ गांधी कुटुंबियांचा गड मानला जातो. १९७७-८० आणि १९९८-१९९९ वगळता इतर वेळी येथे काँग्रेस विजय झाले आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी १९८१-१९९१ या कालावधीत येथील खासदार होते. तर राहुल यांनी २००४ मध्ये येथून निवडणूक लढविली होती. यापूर्वी सोनिया गांधी येथून पक्षाचे प्रतिनिधीत्व करत होत्या. त्या आता रायबरेलीमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.