Lok Sabha Election 2019: मध्य प्रदेशात १२ भाजपा खासदारांना पुन्हा संधी नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 04:02 AM2019-03-16T04:02:06+5:302019-03-16T07:14:33+5:30
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांत जो दणदणीत पराभव पत्करावा लागला, त्यानंतर भाजपा ताकही फुंकून पीत आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशातीलभाजपाच्या विद्यमान खासदारांपैकी १२ जणांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांत जो दणदणीत पराभव पत्करावा लागला, त्यानंतर भाजपा ताकही फुंकून पीत आहे.
उत्तम कामगिरी न बजावलेल्या राज्यातील ८० आमदारांना पुन्हा उमेदवारी देऊ नका असा यासंदर्भात भाजपाने केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष होता. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याच्या परिणामी मोठा फटका बसून मध्य प्रदेशात सलग १५ वर्षे असलेली सत्ता भाजपाच्या हातून गेली. गेल्या, २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने या राज्यातील २९ पैकी २७ जागांवर विजय मिळविला होता. त्यावेळी काँग्रेसचे नेते छिंदवाडा मतदारसंघातील उमेदवार कमलनाथ, गुणामधील उमेदवार ज्योतिरादित्य निवडून आले होते. एका भाजपा नेत्याने सांगितले की, मध्य प्रदेशात राजकीय वस्तुस्थिीकडे दुर्लक्ष केल्याची मोठी किंमत भाजपाने नुकतीच मोजली आहे. काँग्रेसला कमी लेखण्याची केलेली चूक लोकसभा निवडणुकांत भाजपाच्या हातून पुन्हा घडणार नाही. (वृत्तसंस्था)