जयपूरः देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. अशातच निवडणुकीसाठी जवानांना तैनात केलं जात आहे. पण निवडणुकीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना त्याचा मोबदला तर सोडाच, दोन दिवस उपाशी ठेवण्यात आलं. त्यानंतर त्या जवानांनाही राग अनावर झाला आहे. राजस्थानमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर जवानांनी पुन्हा निवडणुकीची ड्युटी करण्यास विरोध केला आहे. उन्हात बसून जवानांनी सरकारविरोधात प्रदर्शन केलं आहे. राजस्थानमधल्या बांसवाडा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. जिथे 200 (होमगार्ड) जवान तैनात होते.शहरातील एका शाळेत राहिलेल्या या जवानांनी सांगितलं की, गेल्या दोन दिवसांपासून आमच्याकडे एक रुपयाही नाही आणि आमचं जेवण मेसमध्ये बनतं. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांपासून आम्ही उपाशी आहोत. अशातच प्रशासन त्यांना कोणताही मोबदला न देता 1 किंवा 2 मे रोजी चुरू आणि भरतपूरसाठी रवाना होण्यास सांगत आहे. त्यामुळे ते जवान प्रशासनावर नाराज आहेत. बाडमेर डी कंपनीचे जवान खेरसिंह म्हणाले, पूर्ण भारतात कुठेही कर्तव्य बजावण्यास तयार आहे. आम्ही आधीही निवडणुकीचं काम केलं आहे. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन करण्यास तयार आहोत. परंतु उपाशीपोटी काम होऊ शकत नाही. प्रसारमाध्यमांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा प्रशासन खडबडून जागं झालं. तसेच जवानांना दोन दिवसांचा मोबदला देण्याचे आदेश काढण्यात आले. तो मोबदला लवकरच मिळणार आहे. त्यानंतर जवानांनी पुन्हा निवडणुकीच काम करण्यास सहमती दर्शवली.तौसाराम नावाच्या जवानाच्या माहितीनुसार, आमच्या खात्यात आगाऊ पैसे जमा केले जातात. त्यानंतर मेसमध्ये जेवण बनवलं जातं. परंतु असं काहीही झालं नाही. त्यामुळेच आम्हाला दोन दिवस उपाशी राहावं लागलं. राजस्थानमधल्या 25 लोकसभा जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 12 जागांसाठी 29 एप्रिलला मतदान झालं. आता उर्वरित 13 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात 6 मे रोजी मतदान होणार आहे. 23 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
दुर्दैवी! कर्तव्यावर असलेल्या 200 जवानांची दोन दिवस उपासमार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 11:46 AM