नवी दिल्ली - राजकारणात युवकांनी यावे, असं आवाहन अनेक नेत्यांकडून करण्यात येते. परंतु, राजकारण फक्त प्रस्थापितांचेच, हे देखील अनुभवायला मिळते. देशात सध्या घराणेशाहीने जोर धरला असून पक्षांतराने सर्वोच्च पातळी गाठली आहे. असं असताना कर्नाटकमधून एक वृत्त आले आहे. ज्यानुसार कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाने एका २८ वर्षीय युवकाला लोकसभेचे तिकीट दिले आहे. तेजस्वी सूर्य असं या युवकाचे नाव असून ते दक्षिण बंगळुरूमधून निवडणूक लढविणार आहे.
याआधी दक्षिण बंगळुरूमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढविणार अशी चर्चा होती. मात्र सोमवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेनंतर तेजस्वी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. व्यावसायाने वकील असलेल्या तेजस्वीने उमेदवारी मिळाल्यानंतर ट्विटरवर शानदार प्रतिक्रिया दिली आहे.
'ऑह माय गॉड, मला विश्वासच बसत नाही ये. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी २८ वर्षीय युवकावर विश्वास दाखवला. हे केवळ भाजपमध्ये होऊ शकतं, असं तेजस्वी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दक्षिण बंगळुरू लोकसभा मतदार संघ प्रतिष्ठेचा मानला जात आहे. या मतदार संघातून केंद्रीय मंत्री अनंत कुमार खासदार होते. त्यांचे निधन झाले आहे. या मतदार संघातून भाजपकडून अनंतकुमार यांच्या पत्नीला तिकीट देण्यात येणार होते. कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांचे देखीत तेच मत होते. तर पंतप्रधान मोदी या मतदार संघातून निवडणूक लढणार अशीही चर्चा होती. परंतु या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत भाजपने तेजस्वी सूर्य यांचे नाव अंतिम केले आले. तेजस्वी भाजप नेत्याच्या कुटुंबातील असून ते आरएसएसशी देखील निगडीत आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांच्यासमोर तेजस्वी सूर्य यांचे आव्हान आहे. बी.के. हरिप्रसाद तब्बल दोन दशकानंतर दक्षिण बंगळुरू मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत.