नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता योगगुरू रामदेव बाबा यांचे एक वक्तव्य सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रामदेव बाबा यांनी नोटबंदीत तीन ते पाच लाख कोटींचा घोटाळा झाल्याचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे हे वक्तव्य चांगलेच व्हायरल होत आहे.
रामदेव बाबा म्हणाले होते की, बँकेवाले एवढे बेईमान असतील, याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील विचार केला नसेल. मला असं वाटते, बँकवाल्यांनी नोटबंदीत हजारो नव्हे तर लाखो कोटींची लूट केली. हा घोटाळा सुमारे तीन ते पाच लाख कोटींचा असेल, असंही रामदेव बाबा म्हणाले होते. या घोटाळ्यासाठी त्यांनी रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांवर बोट ठेवले होते.
एका सिरीजच्या दोन नोटा मिळाल्या आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवर हा मोठा हल्ला आहे. नोटबंदीच्या वेळी कॅशची कमतरता नव्हती, परंतु ही संपूर्ण कॅश बेईमान लोकांना सोपविण्यात आली होती. त्यावेळी नोटांच्या वितरणात सुधरणा करणे आवश्यक होते, असंही रामदेव बाबा यांनी मुलाखतीत म्हटले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता ५०० आणि १००० च्या नोटा बंदीची घोषणा केली होती. अचानक झालेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना अडचणीला सामोरे जावे लागले होते. त्याचवेळी बँक अधिकाऱ्यांनी नोटा बदलून दिल्याचे आरोप झाले होते. मोदी समर्थक मानले जाणारे रामदेव बाबा यांच्या नोटबंदीवरील वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. आता निवडणुकीच्या तोंडावर रामदेव बाबा यांचे वक्तव्य व्हायरल होत आहे. विरोधी पक्षांकडून देखील नोटबंदीत मोठा घोटाळा झाल्याचे आरोप याआधीच करण्यात आले आहेत.