मुंबई - यावेळी झालेली लोकसभा निवडणूक विविध कारणांनी ऐतिहासिक ठरली आहे. मात्र, यातील एक वेगळे कारण म्हणजे पहिल्यांदाच लोकसभा निवडणूकीत 76 महिला खासदार म्हणून संसदेत जाणार आहे. देशातील 542 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत 724 महिलांनी निवडणूक लढवली होती,यातील 76 ठिकाणी महिला उमेदवार ह्या निवडून आल्या आहेत. याआधी सुद्धा महिला लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या आहेत. परंतु, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या महिला खासदारांन एवढा आकडा याआधी कधीच पहायला मिळाला नाही.
लोकसभा निवडणुकीत महत्वाच्या सर्वच पक्षांनी महिलांना नेहमीपेक्षा अधिका जागांवर संधी दिली होती. भाजपने 53 तर कॉंग्रेसने 54 महिला उमेदवार लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरवले होते. दुसरीकडे अपक्ष आणि इतर राष्ट्रीय पक्षांनी सुद्धा महिला उमेदवार मैदानात उतरवल्या होत्या. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता देशात ७६ जागांवर महिला उमेदवार निवडून आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत, देशातील सर्वधिक महिला उमेदवार देणारा राज्य म्हणून पश्चिम बंगाल ठरला आहे. बंगाल मधील एकूण 42 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यातील, 14 महिला उमेदवारांना विजय मिळवता आला आहे. यात, टीएमसच्या 11 तर भाजपकडून 3 महिलांना खासदार पदाची संधी मिळाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10 महिला उमेदवार ह्या विजयी ठरल्या आहेत. त्यातील 9 महिला खासदार भाजपकडून तर कॉंग्रेसकडून एकट्या सोनिया गांधी ह्या महिला खासदार म्हणून विजयी झाल्या आहेत.
ओडीसा मध्ये सुद्धा 8 महिलांना यावेळी संसदेत जाण्याची संधी मिळाली आहे. यात बीजेडीने 21 जागांपैकी 7 ठिकाणी महिलांना संधी दिली होती. यातील 6 ठिकाणी त्यांना यश मिळाले आहे. तर, भाजपच्या 2 महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. देशात यावेळी महिला खासदार यांची संख्या ऐतिहासिक ठरली आहे.