नवी दिल्ली - देशातील जनतेचा चहावाल्याने विश्वासघात केल्याची घणाघाती टीका समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता केली. कौशाम्बी मतदार संघातील उमदेवार इंद्रजीत सरोज आणि प्रतापगडचे उमेदवार अशोक त्रिपाठी यांच्यासाठी आयोजित संयुक्त प्रचार सभेत अखिलेश बोलत होते.
अखिलेश यादव म्हणाले की, पंतप्रधान मोदींची आता पूर्णपणे पोलखोल झाली आहे. गेल्या वेळचा चहावाला आता चौकीदार झाला आहे. जो काहीच कामाचा नाही. राज्यातील नेतृत्व देखील चौकीदारचा समर्थक आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात ठोकोनिती सुरू झाल्याचा आरोप अखिलेश यांनी केला. पोलिसांना अपमानित व्हावं लागत आहे. मात्र आगामी निवडणुकीत चौकीदार आणि ठोकीदार यांना घरी बसावे लागले, असंही अखिलेश यांनी सांगितले.
भाजपने जनतेला धोका दिला आहे. दोन कोटी नोकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांना दिलेले आश्वासने पाळले नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची वाताहत झाली. भारत सरकारवर सध्या ८२ लाख कोटींचे कर्ज असल्याचं अखिलेश यांनी सांगितले. परंतु, लोकशाहीत कुणीही राजा नसतो, तर जनता राजा असते. सध्या राज्यात सपा-बसपा युतीची लाट आहे. त्यामुळे जनता ज्याला वाटेल त्याला राजा बनवणार आहे. ज्याच्या विरुद्ध असेल त्याला खुर्ची सोडावी लागेल, असं सांगताना अखिलेश यांनी भाजप कपटीपणाने निवडणुकीला सामोरे जात असल्याचा आरोप केला.
मतदानाच्या वेळी सायकलसमोरील बटन दाबल्याने चौकीदारी, ठोकीदार आणि धमकीदार या सगळ्यांची सुट्टी होणार आहे. जनतेत असलेला उत्साह पाहता देशात परिवर्तन होणार असं दिसत आहे. कुणालाही वाटत नव्हतं, सपा आणि बसपाची युती होईल. सपा-बसपाची युती म्हणजे शेतकऱ्यांची युती आहे. तरुण, बेरोजगार, दलित, मागास आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी ही युती झाल्याचे अखिलेश पुढे म्हणाले.