मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात १९ मे रोजी मतदान पार पडत आहे. त्यापूर्वी,पश्चिम बंगालमधील राजकरण तापत असल्याचे पहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या पश्चिम बंगालमधील जाधवपूर येथील सभेस परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच त्यांचे हेलीकॉप्टर लँड करण्यास देखील परवानगी नाकारली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार आहेत. हा मतदानाचा शेवटचा टप्पा असल्याने सर्व राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी चांगलीच मेहनत घेतली जात असल्याचे चित्र आहे. अमित शहा जाधवपूर येथे आज रोड शो करणार होते. मात्र त्यांच्या या रोड शोस परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती भाजपने दिली आहे. सुरक्षेचे कारण सांगत ही परवानगी नाकारण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
याआधी देखील ममता बॅनर्जी यांनी भाजप नेत्यांच्या सुरक्षेचे कारण सांगत रोड शो करण्यास व हेलिकॉप्टर लँडिंगला परवानगी नाकारली होती. यापूर्वी २२ फेब्रुवारीला ममता बॅनर्जी यांनी अमित शहा यांच्या मालदा येथील रॅलीच्या दरम्यान त्यांच्या हेलीकॉप्टर लँडिगला परवानगी नाकारली होती. भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर मात्र , ममता यांनी यासाठी परवानगी दिली होती.
अमित शहा आज पश्चिम बंगालच्या दौर्यावर आहेत. पश्चिम बंगालमधील तीन ठिकाणी त्यांच्या सभा आयोजित केल्या आहेत. अमित शहा यांची जयनगर,जाधवपूर व बरासत या तीन लोकसभा मतदारसंघात सभा होणार होत्या.