नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये विजय मिळवल्यानंतर आणि महाआघाडीला पराभूत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच वाराणसी येथे सोमवारी आले होते. यावेळी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात सकाळी 6 वाजताच भाजप अध्यक्ष अमित शहांचा फोन येत असल्याने कामाला लागावे लागत असल्याचा खुलासा योगींनी यावेळी केला. उत्तर प्रदेशमधील एका सभेत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या आलेल्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच सोमवारी आपला मतदार संघ वाराणसी मध्ये गेले होते. याचवेळी, काशी येथील दीनदयाल हस्तकला संकुलमध्ये सभा सुद्धा घेण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांची भाषणे झाले. योगी हे आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत केली आहे. कधीकधी आम्हला वाटायचे की, थोडाफार आराम करायला पाहिजे. पण, रात्री 2 वाजेपर्यंत बैठक आणि सकाळी 6 वाजताच अमित शहा यांचा फोन यायचा. त्यामुळे पुन्हा उठून पक्षाच्या प्रचार कामाला निघावे लागायचे, असे योगी म्हणाले.
या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी जातपात सोडून मोदींना मतदान केले. प्रत्येकला वाटत होते की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच व्हावे, मोदींच्या विरोधात निवडणूक लढवण्याची भाषा करणारे, मोदींचा रोड शो बघून परत फिरकलेच नाही. असा खोचक टोला योगींनी लगावला.