नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावरून आयोजित सभेत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर वैयक्तीक टॅक्सप्रमाणे केला होता, असा आरोप केला होता. त्यावरून राजकारण चांगलेच तापले असून राजीव गांधी यांचे त्यावेळचे मित्र अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सत्य समोर आणावे असं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार राजीव गांधी यांच्यासोबत त्यावेळी अमिताभ बच्चन देखील उपस्थित होते. त्यावेळी अमिताभ आणि राजीव यांच्यात घनिष्ट मैत्री होती. मोदींनी केलेले आरोप काँग्रेसच्या वतीने फेटाळण्यात आले आहे. मात्र अमिताभ बच्चन यांनी या संदर्भातील सत्य समोर आणावे, असं आवाहनही बच्चन यांना करण्यात आले आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनी यासंदर्भात ट्विट करून अमिताभ बच्चन यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत.
अमिताभ बच्चन यांना असं वाटत नाही का, सत्य समोर आणावे ? अशा समयी त्यांना बोलण्याची गरज वाटत नाही का ? असे प्रश्न दिव्या स्पंदना यांनी ट्विटरवरून उपस्थित केले.
दिव्या स्पंदना यांनी एक ट्विट अमिताभ यांच्यासह अभिनेता अक्षय कुमारला देखील टॅग केले आहे. अभिनेता अक्षय कुमारचे आयएनएस सुमित्रावरील फोटो ट्विट करत कॅनडाचा नागरिक असलेल्या व्यक्तीला पंतप्रधान मोदी आयएनएस सुमित्रावर घेऊन गेले होते. ते कसं काय चाललं, असा सवाल स्पंदना यांनी उपस्थित केला. यासोबतच त्यांनी सबसे बडा झूठा मोदी, असा हॅशटॅग वापरला आहे.