नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या आधीच सत्ताधारी आणि विरोधकांची भेटीगाठी पहायला मिळत आहे. आपचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आम्ही सोबत असल्याचा दावा केला आहे. गुरुवारी होणाऱ्या मतमोजणी बाबत या दोन्ही नेत्यांनी फोनवरून चर्चा केली असल्याचा खुलासा आपने केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही तास शिल्लक राहिले आहेत. त्याआधीच, विरोधीपक्ष यांच्यातील भेटीगाठी वाढल्या असून, मतमोजणीनंतरच्या रणनीती कशी असणार यावर चर्चा केली जात आहे. याचप्रमाणे, अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांच्यात ही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गुफ्तगू झाली आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी लखनौ येथे अखिलेश यांची भेट घेतली आणि त्यावेळी केजरीवाल यांच्याशी फोन वर बोलणे सुद्धा करून दिले आहे. त्यांनतर लगेच अखिलेश यांनी 'आप सोबत' असे ट्विट केले आहे.
आपचे खासदार संजय सिंह यावेळी म्हणाले की, भाजपला पुन्हा सत्ता मिळविण्यापासून रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी १७ रोजी अरविंद केजरीवाल आणि टीडीपीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांच्यात भेट झाली आहे. तर, अखिलेश यांच्या ट्विटनंतर त्याला उत्तर देताना, केजरीवाल यांनी 'आम्ही पण आपल्या सोबत आहोत, अखिलेश जी' असा ट्विट केले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून उत्सुकता लागलेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी करण्यात येणार असून, निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. मंगळवारी दुपारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये 19 विरोधी पक्षांची बैठक झाली. दुसरीकडे भाजपने त्याच दिवशी 'एनडीए'च्या नेत्यांसोबत 'डीनर पार्टी'चे आयोजन केले होते.