नवी दिल्ली - काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी दिल्लीत रोड शो करणार आहेत. यावर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी टीका केली आहे. दिल्लीतील सातही लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होईल, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना देखील तीन प्रश्न विचारले आहेत.
प्रियंका गांधी यांनी माझी विनंती आहे की, त्यांनी आपला बहुमुल्य वेळ दिल्लीत वाया घालवू नये. काँग्रेसच्या सातही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे. तसेच काँग्रेसमुळे आपचे काही मते विभागली जातील. त्यापेक्षा प्रियंका यांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीगडमध्ये सभा घ्याव्यात, असंही केजरीवाल यांनी म्हटले आहे.
प्रियंका गांधी यांचा उत्तर दिल्ली आणि दक्षिण दिल्ली लोकसभा मतदार संघात रोड शो आयोजित करण्यात आला आहे. तसेच उत्तर पूर्व दिल्लीत शीला दीक्षित यांच्यासाठी देखील प्रियंका रोड शो करणार आहे.
दुसरीकडे केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन प्रश्न विचारले आहेत. दिल्लीत सिलींगला रोखण्यासाठी भाजप अध्यादेश का काढत नाही ? २०१४ मध्ये मोदींनी रामलीला मैदानातून म्हटले होते की, सात जागांवर भाजला निवडून दिल्यास दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ ? आणि मोदींचा पाकिस्तानशी काय संबंध आहे ? याच उत्तर द्यावे, असे प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केले आहे.