नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहेत. मात्र त्याआधीच विविध पक्षांकडून एकतर्फी निकाल लागणार असल्याचे अंदाज वर्तविण्यास सुरुवात झाली आहे. यात आता आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा देखील समावेश झाला आहे. केजरीवाल यांनी दिल्लीतील 'आप'च्या स्थितीबद्दल सांगितले.
केजरीवाल यांच्या मते दिल्लीतील सातही जागांवर 'आप'च्या विजयाची आशा होती. मात्र ऐनवळी डाव पलटला. अखेरच्या क्षणी 'आप'ची सर्व मते काँग्रेसला शिफ्ट झाल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. 'आप'ला किती जागा मिळणार, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे केजरीवाल यांनी टाळले. तसेच मतदानाच्या ४८ तासांपर्यंत आम्हाला वाटले होते की, 'आप' सर्व जागा जिंकेल. मात्र ऐनवेळी सर्व मते काँग्रेसला गेली. निवडणुकीच्या एक दिवसआधी हे घडले आहे. दिल्लीतील मुस्लीम मते काँग्रेसला कशी गेली याचा आम्ही शोध घेत असल्याचे देखील केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लीत १२-१३ टक्के मुस्लीम मते आहेत.
भाजपच्या पुन्हा सत्तेत येण्याच्या शक्यतेवर यावेळी केजरीवाल यांनी आपले मत मांडले. केजरीवालांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा काढला. इव्हीएममध्ये घोटाळा झाला नसेल तर मोदींचे पुनरागमन अशक्य आहे. तसेच केंद्रात मोदी आणि अमित शाह यांच्या व्यतिरिक्त सरकार स्थापन झाल्यास त्याला आपण पाठिंबा देऊ परंतु, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे वचन देणाऱ्यालाच पाठिंबा देऊ, असंही त्यांनी स्पष्ट केले.
२०१४ लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला सर्वच्या सर्व ७ जागांवर दारुण पराभव पत्करावा लागला होता. यावेळी 'आप'ने काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत युती होऊ शकली नाही. त्यानंतर काँग्रेस आणि 'आप' स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेले.