नवी दिल्ली - दिल्लीतकाँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यातील युतीसंदर्भात अजुनही काहीही निर्णय झाला नाही. त्यामुळे काँग्रेस, आप आणि भाजप अशी तिरंगी लढाई राजधानी दिल्लीत अपक्षीत होती. मात्र आता या लढाईत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने एंट्री करण्याचं निश्चित केले आहे. त्यामुळे दिल्लीतील लोकसभा निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील माजी बसपा प्रमुख सी.पी. सिंह यांनी बसपा दिल्लीतील सातही जागा लढणार असल्याचे सांगितले.
पुढील दोन दिवसांत दिल्लीतील सातही बसपा उमेदवारांचे नाव निश्चित होणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. दिल्लीत बसपाने निवडणूक लढविल्यास राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
बसपाकडून १९८९ पासून दिल्लीत निवडणूक लढविण्यात येत आहे. दिल्लीत आपचा उद्य होण्यापूर्वी बसपाची भूमिका महत्त्वपूर्ण असायची. मात्र त्यांना एकही लोकसभा मतदार संघात विजय मिळवता आलेला नाही. मात्र २००८ मध्ये दोन विधानसभा मतदार संघात बसपाचे उमेदवार निवडून आले होते. तर सहा जागांवर १४.५ टक्के मतदान मिळवले होते.
दरम्यान काँग्रेस आणि आपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युतीच्या चर्चा आहेत. काँग्रेसला दिल्लीत तीन जागा हव्या आहेत. मात्र अद्याप यावर काहीही निर्णय झाला नाही. अनेकदा काँग्रेस-आप युतीची चर्चा फिसकटल्याचे वृत्त आले होते. त्याचवेळी युती होणार अशाही बातम्या प्रसिद्ध होतात. त्यात आता बसपाने उडी घेतल्यामुळे दिल्लीतील निवडणूक आणखीनच रंगतदार होणार आहे. दिल्लीत १.४ कोटी मतदार आहेत. यामध्ये १५ टक्के दलित असून बसपाचं या मतदारांवर लक्ष आहे.