भोपाळ - लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी मतदान करावं यासाठी निवडणूक आयोग देशभर विविध कार्यक्रम राबवत आहे. निवडणूक आयोग, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पथनाट्ये, विविध कार्यक्रमांतून मतदानासंदर्भात जनजागृती केली जात आहे. मात्र निवडणुक आयोगाच्या एका निर्णयाचा फटका हा 100 जणांना बसला आहे. जवळपास 100 कैद्यांना आपल्या मुलीचे कन्यादान हे निर्णयामुळे करता येणार नाही.
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे लग्न सराईची धामधूम आहे. निवडणुक आयोगाकडे निवडणुकीच्या काळातील प्रशासनासंदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार असतात. मात्र अशाच एका निर्णयाचा फटका हा तुरुंगातील कैद्यांना बसला आहे. कारण आयोगाने राज्यातील सर्व कैद्यांना पॅरोल देण्यास मनाई केली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे 100 कैद्यांना मुलांच्या लग्नासाठी जाता येणार नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलींचे कन्यादानही करता येणार नाही.
भोपाळ सेंट्रल जेलमध्ये असे अनेक कैदी आहेत ज्यांना मुलांच्या लग्नासाठी जायचे आहे. यातीलच एक कैदी सलीम हे सध्या एका हत्या प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. सलीम यांच्या मुलीचा विवाह 26 एप्रिल रोजी शाजापूर येथे होणार आहे. पण आयोगाच्या निर्णयामुळे त्याला आता सुट्टी मिळणार नाही. सलीम यांच्या प्रमाणेच आणखी काही कैदी आहेत ज्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्याची इच्छा आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आता ते शक्य नाही.
तुरुंगातील सर्व कैद्यांना आधी तुरुंग प्रशासनाने पॅरोल मंजूर केला होता. पण आता आयोगाच्या आदेशामुळे तो रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या कैद्यांच्या मुलींचे लग्न आहे त्यांना कन्यादान कसे करायचे असा प्रश्न पडला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 130 तुरुंग आहेत. या सर्व तुरुंगात मिळून 18 हजार कैदी आहेत. त्यापैकी 4 हजार जणांना प्रत्येक वर्षी पॅरोल दिला जातो. राज्यात असे एकूण 100 कैदी आहेत ज्यांना मुलाच्या अथवा मुलीच्या लग्नासाठी जायचे आहे. भोपाळ सेंट्रल जेलचे अधिक्षकांनी यांसंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, ज्या कैद्यांनी पॅरोलसाठी अर्ज केले आहेत. त्यांचे अर्ज आयोगाकडे परवानगीसाठी पाठवण्यात आले आहेत. आयोगाने जर परवानगी दिली तर त्यांना सुट्टी दिली जाईल.
जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले होते. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.