पाटना - बिहारमध्ये अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर महायुतीचा फॉर्म्युला निश्चित होताना दिसत आहे. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर बिहारमधील ४० लोकसभा जागांसाठी महायुतीचा निर्णय झाल्याचे म्हटले आहे. याआधी उभय पक्षांमध्ये जागा वाटपावरून बोलणी फिसकटल्याचे वृत्त आले होते.
बिहारमध्ये आरजेडी १९ आणि काँग्रेस ९ जागांवर निवडणूक लढविणार आहे. तर उर्वरित जागांवर महायुतीतील आरएलएसपी या सारखे छोटे पक्ष निवडणूक लढविणार आहे. दरम्यान या जागावाटपात अद्याप भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सामील करण्यात आलेले नाही. सीपीआयएम बेगूसरायमधून कन्हैया कुमार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जागा महायुतीकडून कन्हैया यांच्यासाठी सोडण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये ११ जागांसाठी अडून बसलेल्या काँग्रेसने अखेर ९ जागांवर निवडणूक लढविण्यास संमती दर्शविली आहे. काँग्रेसने ज्या दोन जागा सोडल्या आहेत, त्या सीपीआयएमला देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. तर उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएसपीला (राष्ट्रीय लोक समता पक्ष) ४, जीतन मांझी यांच्या हिंदूस्थान आवाम मोर्चाला (एस) २, शरद यादव यांच्या एलजेडीला २ आणि मुकेश सहानी यांच्या व्हीआयपीला १ जागा देण्यात आली आहे.