मुंबई - दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दलच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सोशल मीडियावर मोदींच्या टीकेचा निषेध करण्यात येत असून काँग्रेस देखील आक्रमक झाले आहे. त्यातच आता भाजपमधून देखील मोदींनी केलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर वन होते आणि त्यांचा भ्रष्टाचारी ओळख म्हणुनच मृत्यू झाला. असे, मोदींनी बोलायला नको होते. मोदींबद्दल माझ्या मनात आदर आहे. मी या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवणार नाही असे भाजप नेते श्रीनिवास प्रसाद म्हणाले आहे. कमी वयात राजीव यांच्यावर मोठी जबाबदारी होती. भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राजीव गांधी यांच्याविषयी चांगल्या गोष्टी अनेकदा जगजाहीर सांगितल्या आहे. अशा प्रकारे भाजपचे नेते श्रीनिवास प्रसाद यांनी मोदींना टोला लागवला.
श्रीनिवास प्रसाद हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. त्यांनतर त्यांनी कॉंग्रेसचा हात धरला होता. मात्र, २०१७ मध्ये त्यांनी घरवापसी करत पुन्हा भाजप मध्ये प्रवेश केला होता.
माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका होत आहे. कॉंग्रेसने मोदींवर निशाणा साधला असतानाच आता, भाजप नेत्याने सुद्धा मोदींना घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे राजीव गांधी यांच्या विषयी मोदींनी केलेल्या टीकेमुळे भाजपमध्ये सुद्धा नाराजी असल्याचे समोर आले आहे.