मुंबई - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी भाजप सोडून काँग्रेसचा हात धरणारे शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर कडाडून टीका केली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या स्वभावातच धोका देणे आहे. पंधरा दिवसांतच त्यांनी काँग्रेससोबत दगा फटका केल्याचे ट्विट पांडे यांनी केले. यावर अद्याप शत्रुघ्न सिन्हा यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
सिन्हा यांच्या स्वभावातच धोका देणे आहे. त्यांनी १५ दिवसांच्या आतच काँग्रेसला धोका दिला. पत्नीसाठीचा मोह त्यांना आवरता आला नसून काँग्रेसमध्ये सामील झालेले सिन्हा बायकोसाठी समाजवादी पक्षाच्या रॅलीत सामील झाल्याचे पांडे यांनी म्हटले. तसेच सिन्हा कायम भाजपला धोका देत राहिले. आता पटना साहिबमधून काँग्रेसचे उमेदवार असलेले सिन्हा यांच्याविषयी १५ दिवसांतच काँग्रेसकडून तक्रारी सुरू झाल्या आहेत. पूनम सिन्हा यांच्याविरुद्ध लखनौमधून काँग्रेसचे उमेदवार असलेले आचार्य प्रमोद कृष्णम यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सिन्हा यांनी पक्षधर्म निभवावा असंही म्हटल्याचे पांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
लोकसभा निवडणुकीत लखनौमधून सपाची उमेदवारी मिळालेल्या पूनम सिन्हा यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आयोजित रोडशोमध्ये सिन्हा पत्नी पूनम यांच्यासोबत उपस्थित होते. यावर प्रमोद कृष्णम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिन्हा यांनी पार्टी धर्म निभवावा आणि माझ्यासाठी देखील एक दिवस प्रचार करावा, अशी इच्छा कृष्णम यांनी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वीच पूनम सिन्हा यांनी सपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना लखनौमधून उमेदवारी मिळाली आहे. लखनौमध्ये भाजपकडून राजनाथ सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढत रंगणार आहे.