नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमधून मोठे वृत्त आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपवर नाराज असलेले खासदार आणि अभिनेते शत्रु्घ्न सिन्हा काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत. सिन्हा हे पटना साहिब येथून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. महायुतीची बोलणी फिसकटल्यानंतर सिन्हा यांनीच मध्यस्थी करून काँग्रेस आणि आरजेडीला एकत्र आणल्याचे सिन्हा यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
बिहारमध्ये ९ जागांवर निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस तयार झाले आहे. यापैकी एक पटना साहिब मतदार संघ आहे. येथून बिहारीबाबू अर्थात सिन्हा निवडणूक लढविणार आहेत. सिन्हा ज्या मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत, तो मतदार संघ भाजपला मिळाला आहे. सिन्हा येथून भाजपलाच आव्हान देणार आहे. या जागेवर भाजपकडून केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांना मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास रविशंकर प्रसाद-सिन्हा लढत पाहायला मिळणार आहे.
सोशल मीडिया असो वा सार्वजनिक कार्यक्रम, सिन्हा यांनी कधीही भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यांनी ट्विटरवरून भाजप सोडण्याचे संकते दिले होते. तसेच सिन्हा हे आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी भाजपमध्ये असताना अनेकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. आता ते काँग्रेसमध्येच सामील होणार असल्याचे समजते.