नवी दिल्ली : सात केंद्रीय मंत्र्यांसह सुमारे एक डझन राज्यसभा सदस्यांना भाजपा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा विचार करीत असल्याचे सूत्रांकडून कळते. हे सदस्य लोकसभेवर निवडून आल्यास त्यांच्या रिकाम्या होणाऱ्या राज्यसभेच्या जागा सहजपणे पुन्हा जिंकता येतील एवढे पुरेसे संख्याबळ ज्या राज्य विधानसभांमध्ये आहे त्याच राज्यसभा सदस्यांच्या विचार सुरु आहे.२५ कॅबिनेट मंत्र्यांपैकी १२ राज्यसभेवर आहेत. त्यापैकी स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, थावरचंद गेहलोत, जे. पी. नड्डा, रवी शंकर प्रसाद, चौधरी बिरेंद्र सिंग व मुख्तार अब्बास नक्वी या ७ जणांना लोकसभेवर पाठविण्याची शक्यता आहे. धमेंद्र प्रधान पेट्रोलियममंत्री झाल्यापासून भाजपाचा ओडिशातील चेहरा ठरले. २००९ च्या निवडणुकीत ते ओडिशामधील देवघर मतदारसंघातून लोकसभेवर गेले होते. पुनर्रचनेनंतर तो मतदारसंघ राहिला नाही त्यामुळे नंतर त्यांना राज्यसभेवर निवडून आणले गेले. आता ओडिशातील त्यांचे राजकीय वजन वाढल्याने त्यांना यावेळी त्या राज्यातील अन्य एखाद्या मतदारसंघातून उभे केले जाऊ शकते.सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत हे मध्य प्रदेशमधीलभाजपाचे अनुसूचित जातींमधीलएक वजनदार नेते मानले जातात.२०१२ च्या आधी ते त्या राज्यातील शाजानपूर राखीव मतदारसंघातून सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. नंतर त्यांना राज्यसभेत पाठविले गेले. त्यांना पुन्हा लोकसभेत आणले जाऊ शकते.आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी गेली लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. परंतु नेते शांताकुमार उभे राहिले नाहीत तर हिमाचल प्रदेशातील कांगडा मतदारसंघातून नड्डा यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांना बिहारमधील पाटणासाहेबमधून उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. तेथून निवडून आलेले सध्याचे लोकसभा सदस्य शत्रुघ्न सिन्हा बंडखोर वृत्तीमुळे पक्षात असून नसल्यासारखे असल्याने यावेळी त्यांना तिकिट न देता त्यांच्याजागी प्रसाद यांना पक्ष उमेदवारी देऊ शकतो.अल्पसंख्य व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना उत्तर प्रदेशातील रामपूरमधून उभे केले जाण्याची शक्यता आहे. पूर्वी १९९८ मध्ये नक्वी तेथून लोकसभेवर निवडून गेले होते. दिल्लीमध्ये केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांच्याऐवजी विजय गोयल यांना चांदणी चौकमधून उभे करून हर्षवर्धन यांना पूर्व दिल्लीमधून महेश गिरी यांच्याजागी उमेदवारी दिली जाण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.स्मृती इराणी अमेठीमधून?वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांना याहीवेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध अमेठीमधून उभे केले जाणार असल्याचे कळते. गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर इराणी राज्यसभेवर निवडून आल्या तरी त्यांनी अमेठीमध्ये येऊन जनसंपर्क सुरूच ठेवला. इराणी भले निवडणूक हरल्या असतील, पण त्यांनी अमेठीच्या मतदारांची मने जिंकली आहेत, अशी पावती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच अलीकडे तेथील एका कार्यक्रमात दिली होती.
Lok Sabha Election 2019: राज्यसभा सदस्यांना भाजपाचे तिकीट?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 4:37 AM