मुंबई - गुगलवर जाहिराती करण्यासाठी खर्च करण्याच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाने देशातील सर्वच राजकीय पक्षांना मागे टाकले आहे. तर गुगल जाहिरातींवर खर्च करणाऱ्यांमध्ये काँग्रेस सहाव्या स्थानी आहे. 'भारतीय पारदर्शक अहवाला'नुसार राजकीय पक्ष आणि त्यांच्या इतर घटकांनी फेब्रुवारी २०१९ पर्यंत ३.७६ कोटी रुपये खर्च केले आहे.
यामध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. जाहिरातीच्या एकूण खर्चात एकट्या भाजपने १.२१ कोटी रुपये गुगल जाहिरातींवर खर्च केला आहे. गुगलवरील जाहिरातीत भाजपचे प्रमाण ३२ टक्के आहे. या यादीत प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस गुगलवरील जाहिरातीच्या बाबतीत सहाव्या स्थानी आहे.
या यादीत भाजपनंतर आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वातील वायएसआर काँग्रेस पक्ष आहे. वायएसआर काँग्रेसने १.०४ कोटी रुपये गुगल जाहिरातीवर खर्च केले आहेत. यामध्ये पम्मी साई चरण रेड्डीने वायएसआर काँग्रेसच्या प्रचारासाठी २६,४०० रुपये खर्च केले. तर तेलगु देसम पक्षाचे 'प्रमाण्य कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड' खर्चाच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी आहे.
दरम्यान देशातील राजकीय पक्ष ऑनलाईन आणि सोशल मीडियावर पक्षाचा आणि उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी प्राधान्य देत आहेत. देशात एन्ड्रॉईड फोन वापरणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे डिजीटल प्रचाराला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांचा कल गुगल जाहिरातींवर असल्याचे दिसते.